विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. अजितदादांच्या निधनानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. दरम्यान, शोकप्रस्तावावेळी सर्व पक्षांचे गटनेते आपल्या भावना मांडतील, तसेच प्रत्येक पक्षाच्या तीन सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाईल. यावेळी अजितदादांच्या आजवरच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीतील आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.
वरळी येथील ‘एनएससीआय डोम’ येथे सोमवारी सायंकाळी भव्य सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज्यातील आणि देशातील सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार असून ते अजितदादांना अभिवादन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश असणार आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेदेखील या शोकसभेला उपस्थित राहून अजितदादांना श्रद्धांजली वाहणार आहेत.















