आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आशिष शेलार यांचा मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता भाजपाने अमित साटम यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. 2017 च्या निवडणुका असतील, आत्ताच्या निवडणुका त्यांनी उत्तम काम केलं. मंगलप्रभात लोढा यांनी उत्तम रितीने कार्यभार सांभाळला. पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे धुरा आली, विधानसभेत चांगले यश मिळाले. मुंबईतील नंबर एकचा पक्ष म्हणून सिद्ध केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नव्या संघटनात्मक रचनांकडे अमित साटम यांच्याकडे भार आलाय. अमित साटम तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत, नगरसेवक होते. प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक अशी अमित साटम यांची प्रतिमा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. पुन्हा महायुतीची मुंबईत सत्ता येईल हा विश्वास आहे. सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या ते चांगल्या पद्धतीनं पार पडतील. सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीमागं आहेत. अमित साटम यांना शुभेच्छा देतो, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.














