राज ठाकरे यांनी १८ वर्षांपूर्वी शिवसेना सोडली. त्यावेळी ठाकरे बंधूंमध्ये वितुष्ट आले होते. मधल्या काळात दोघांनीही उघडपणे एकमेकांवर टोकाची टीका केली. पण गेल्या दोन महिन्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगली. त्यानंतर ५ जुलैला ठाकरे बंधू एकत्र आले. आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले. राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनी मातोश्रीवर आले. याआधी अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ५ जानेवारी २०१९ रोजी ते आले होते. त्यानंतर आज राज यांनी पुन्हा मातोश्रीची पायरी चढली. राज यांच्यासोबत नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकरदेखील होते. उद्धव यांना शुभेच्छा दिल्यावर राज मातोश्रीमधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले. त्याठिकाणी त्यांनी बाळासाहेबांच्या आसनाला अभिवादन केले. या क्षणाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
दरम्यान, त्याआधी आज सकाळी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने मातोश्री फुलांनी सजविण्यात आली होती.














