मुंबईसह २९ महापालिकांसाठीचं मतदान सुरु झालं आहे. २९ महापालिकांची ही निवडणूक ज्याकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जातं आहे. मुंबईसह, पुणे, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नाशिक, नागपूर यांसह सगळ्यात २९ महापालिकांमध्ये काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महापालिका असा मुंबईचा लौकिक आहे. या महापालिकेमध्ये २५ वर्षांपासून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सत्ता होती. आता यावेळी पहिल्यांदाच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.
नांदेड -वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीसाठी २० प्रभागातून ८१ जागांसाठी ४९१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली, यावेळी सकाळ पासूनच मतदारांत उत्साह पहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊ पर्यंत सरासरी ७.१६ मतदान झालै आहे.एकुण पाच लाख १७९९ मतदारां पैकी पहिल्या टप्प्यात दोन तासात ३५९५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर जाताना दिसत आहेत तर कांही ठिकाणी उमेदवार, कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी घराबाहेर पडा असे आवाहन करत अॅटो व कार, दुचाकी व इतर वाहनांनी त्यांना मतदान केंद्रावर पोहंचविण्याची व्यवस्था करत आहेत.
सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदानास सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांत एकूण ६.४५ टक्के मतदान झाले असून पुढील तासांत मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. मतदान केंद्रांबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी असून मतदारांना ने-आण करण्यासाठी खासगी वाहने वापरली जात आहेत. ज्येष्ठ, महिला व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.















