पुण्यातील कोथरुड येथील वादग्रस्त जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे. जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यात झालेला हा व्यवहार रद्द करण्यात यावा, असे आदेश आज धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. या व्यवहारावरून भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर मोहोळ यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि सुरुवातील गोखले बिल्डर हा व्यवहार रद्द करण्यासाठी पहिलं पाऊल टाकत जैन ट्रस्टला ईमेलद्वारे विनंती केली. आता धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिल्याने जैन समाजाला मोठा दिलासा आहे. तर दुसरीकडे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यवहार रद्द झाल्यानंतर राजकीय विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“या विषयात पुण्यातील जैन समाजातील कोणत्याही व्यक्तीने माझ्यावर अविश्वास दाखवत वैयक्तिक आरोप केला नाही. परंतु काही राजकारण्यांनी स्वार्थासाठी हेतुपुरस्कर माझ्यावर खोटेनाटे आरोप करत बदमानी करण्याचा प्रयत्न केला. तरीही माझ्या आणि समाजातील नात्याला तडा जाण्याची अजिबातच शक्यता नव्हती,” असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांची मालिका सुरू झाल्यानंतर भाजपमधून त्यांना अपेक्षित साथ मिळत नसल्याची चर्चां रंगत होती. यावर पत्रकारांनी आज प्रश्न विचारला असता ‘माझा पक्ष आणि माझे मुख्यमंत्री माझ्यासोबत होते,’ असं मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग प्रकरणावरून मुरलीधर मोहोळांवर घणाघाती आरोप केले होते. हा व्यवहार रद्द होताच मोहोळ यांनी धंगेकरांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. “या प्रकरणात पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय झालं, याची इत्यंभूत माहिती मी तुम्हाला भविष्यात नक्की देणार आहे. त्यासाठी योग्य वेळ येऊ द्या. माझं नाव का घेतलं, मला यात का ओढलं, हे मी भविष्यात सांगेन,” असं त्यांनी म्हटलं आहे.














