kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी !! दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन महादेव’चे तांडव! ; पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. आता जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 97 दिवसांनंतर अखेर भारतीय सैन्याला मोठे यश मिळाले आहे. ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात्मक कारवाई करत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ही चकमक सोमवारी श्रीनगरमधील लिडवास परिसरात झाली. याबाबत चिनार कॉर्प्सने माहिती दिली असून, ही कारवाई पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी नेटवर्कविरोधात करण्यात आल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुलेमान, यासिर आणि अली या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यापैकी सुलेमान आणि यासिर हे पहलगाम हल्ल्यात सामील होते, अशी माहिती समोर आली आहे. तथापि, सैन्याच्या वतीने यासंदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून, आज संध्याकाळपर्यंत प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती देण्यात येईल, असे सैन्याने स्पष्ट केले आहे.

श्रीनगरमधील लिडवास परिसरात लष्कराने ऑपरेशन महादेव राबवले, यात तीन दहशतवादी ठार झाले. महादेव शिखराला लागून असलेल्या भागातच ही मोहीम घेतली गेल्याने याला हे नाव दिलं गेलं.

भारतच नाही, तर जगभरातील लष्करी मोहिमांना असे कोडनेम दिले जाते. भारतीय लष्कराने आधी पाकिस्तानातील दहशतवादी तळे उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर रावबले होते. सध्या ऑपरेशन महादेव सुरू आहे.

लष्करी मोहिमांचे नाव त्या बैठकीत ठरते, ज्या बैठकीमध्ये पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि लष्कराचे मोठे अधिकारी हजर असतात. जर ऑपरेशन खूपच मोठे आणि गोपनीय असेल, तर त्या बैठकीला फक्त मोजकेच लोक असतात.

लष्कराच्या मोहिमांना नाव देण्यामागे कारण असते, रणनीती, लक्ष्य पूर्ण करेपर्यंत गोपनीयता बाळगली जावी. त्याचबरोबर ऑपरेशनच्या नावाचा जवानाचे मनोधैर्य वाढवण्यावरही परिणाम होतो. मोहिमांना त्या घटनांशी संबंधित किवा त्या जागांच्या संदर्भाने नावे दिली जातात.

लष्कराच्या मोहिमांच्या नावातून एक स्पष्ट मेसेज दिलेला असतो. त्या नावातून मोहिमेचे लक्ष्य काय, हे याबद्दलचीही स्पष्टता असते. उदाहरणार्थ, पहलगाममध्ये पर्यटकांची त्यांच्या पत्नी-मुलांसमोर हत्या केल्या गेल्या. महिला विधवा झाल्या. त्यांचे कुंकू पुसले गेले. त्याचा बदला घेणारी लष्करी मोहीम म्हणून ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले गेले.