kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सडकून टीका

सणासुदीच्या काळात मुंबईत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, लेप्टो आणि हिपॅटायटिससारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. या वाढत्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यात बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग संपूर्णपणे अपयशी ठरला आहे. हे अक्षम्य दुर्लक्ष असून, ही परिस्थिती मुंबईकरांसाठी गंभीर धोक्याची घंटा आहे, अशी तीव्र टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.

मातेले म्हणाले की, “घरचं सांभाळायला सोडलं आणि परक्याची काळजी करायला निघाल्यागत” पालिकेची आरोग्य व्यवस्था काम करताना दिसते. सणाच्या धामधुमीत लोक आनंद साजरा करत असताना, रुग्णालयात रुग्णांची रांग वाढत आहे. “नाचता येईना अंगण वाकडं” या म्हणीप्रमाणे पालिका स्वतःच्या कमतरता लपवण्यासाठी कारणांची यादी पुढे करते, पण प्रत्यक्षात मुंबईकरांचे जीव धोक्यात घालते.

डेंग्यू, मलेरिया नियंत्रणासाठी आवश्यक ती डास निर्मूलन मोहीम वेळेवर राबवण्यात पालिका अपयशी.नालेसफाई, पाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे डासांची प्रचंड उत्पत्ती. आरोग्य केंद्रे व रुग्णालयांमध्ये तपासणी व उपचार व्यवस्था अपुरी.लेप्टो आणि हिपॅटायटिस रोखण्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यात पालिकेची उदासीनता. आरोग्य विभागाकडून वेळोवेळी जनजागृती मोहिमा न राबवणे, नागरिकांना अंधारात ठेवणे.

तातडीने डास निर्मूलन मोहीमा युद्धपातळीवर राबवाव्यात. स्वच्छता व्यवस्था व नालेसफाईचे काम पारदर्शकपणे पूर्ण करावे.
प्रत्येक वॉर्डमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत.पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारून नागरिकांना सुरक्षित पाणी पुरवावे.आरोग्य विभागाच्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी.मातेले यांनी स्पष्ट इशारा दिला की, “मुंबईकरांच्या जीवाशी खेळणे आम्ही सहन करणार नाही. जर ही परिस्थिती तातडीने सुधारली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.”