kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पण … मोहोळ-धंगेकरांसह महायुतीचे नेते आपापसात का भांडत आहेत?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजू लागले आणि त्यातच महायुतीतल्या नेत्यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडायला लागल्या.धंगेकर विरुद्ध मोहोळ, गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे, मेधा कुलकर्णी विरुद्ध रुपाली पाटील, अजित पवार विरुद्ध मोहोळ…गेल्या काही महिन्यांमध्ये महायुतीत एकमेकांसमोर आलेल्या मित्रपक्षांमधल्या नेत्यांची ही काही उदाहरणं.

पण हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे? की यामागे आणखी काही डावपेच आहेत? आणि अशी भांडणं सुरू असताना महायुतीतले नेते निवडणुकीला सामोरे जाणार कसे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शिवसेना फुटल्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि स्थानिक पातळीवरही शिंदेसोबत गेलेले नेते भाजपसोबत जुळवून घेताना दिसू लागले.विधानसभा निवडणुका होता होता राष्ट्रवादी फुटून अजित पवारही सोबत आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन झालं.

“आम्ही एकत्र आहोत,” असं हे नेते सांगत असतानाच काही ना काही कारणाने धुसफूस होताना दिसत होतीच. पण तरीही नेत्यांच्या निमित्ताने कार्यकर्तेही एकत्र येत असल्याचं चित्र समोर तरी दिसत होतं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होईल, असे अंदाज वर्तवले जात होते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ यायला लागल्या तसं मात्र, हे चित्र पालटताना दिसत आहे.

राज्यात 2012 पर्यंत मुंबईच शिवसेना, पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये पुणे पॅटर्नचा अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असं समीकरण होतं. पण, गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये हे समीकरण बदलताना दिसलं. मुंबई शिवसेनेकडं असली तरी तिथे फुटीनंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपचा प्रभाव निर्माण झाला. तर ठाण्याचा गड शिंदेंच्या ताब्यात राहिला. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने मोठी आघाडी मिळवली. महायुतीमध्ये या बालेकिल्ल्यांमध्येच या पक्षांना आव्हान निर्माण होताना दिसत आहे. याची एका अर्थाने सुरुवात झाली ती शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातूनच.

नाईक विरुद्ध शिंदे

गणेश नाईकांनी सुरू केलेला जनता दरबार शिवसेनेच्या नेत्यांना खटकला आणि त्यावरून समांतर सत्ताकेंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. हा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला. मात्र त्यावर पांघरूण पडलं नाही. कधी वक्तव्य तर कधी कार्यक्रम या माध्यमातून नाईक विरुद्ध शिंदे असा संघर्ष ठाण्यात उभा राहताना दिसत आहे. मात्र त्याचे तेवढे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत नव्हते.

राज्याच्या राजकारणावर त्याचे थेट पडसाद दिसत नसले तरी ठाण्यावर आपली सत्ता राखण्यासाठी शिंदेंसाठी युतीचा निर्णय महत्त्वाचा ठरणार होता. त्यामुळेच शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा होती. पण पुण्यात सुरू झालेल्या वादांमुळे तर आता महायुतीतले तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत का? असा प्रश्न उपस्थित करणारं चित्र निर्माण झालं आहे.

मेधा कुलकर्णी विरुद्ध रुपाली पाटील

शनिवार वाड्यात नमाज पढली गेल्याचा आरोप भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींनी केला. त्यापाठोपाठ शनिवार वाड्यात जात ‘शुद्धिकरण’ही केलं. इथे त्यांना आव्हान दिलं ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांनी. रुपाली पाटील यांनी शनिवार वाड्यासमोर कुलकर्णींच्या विरोधात आंदोलन करतानाच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. याच रुपाली पाटील भाऊबीजेच्या निमित्ताने रविंद्र धंगेकरांना राखी बांधतानाही दिसल्या.

मोहोळ विरुद्ध धंगेकर

गुंड नीलेश घायवळच्या पासपोर्टचं प्रकरण समोर आलं आणि त्यानिमित्ताने मध्यंतरी बराच काळ शांत असणारे रवींद्र धंगेकर चंद्रकांत पाटलांवर आरोप करताना दिसले.पाठोपाठ मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंगच्या व्यवहाराच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर राजू शेट्टींनी आरोप केले त्यातही धंगेकर उतरले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रोज एक पोस्ट असं करत आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली. मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची बाजू मांडताना बोर्डिंग-संबंधित व्यवहार हे आपण या संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर झाल्याचं स्पष्ट केलं. पण पाठोपाठ धंगेकरांनी मोहोळ हे आणखी एका बिल्डरची गाडी महापौर पदाच्या कालावधीत वापरत असल्याचं म्हटलं. यानंतर शिंदे गटातून धंगेकरांची हकालपट्टी होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांना तंबी दिल्याचंही सांगितलं गेलं.

अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ

फक्त स्थानिक नेतेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवारही मोहोळांवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. प्रभागरचना मनासारखी झाली नसल्याने ते नाराज असल्याचं म्हटलं जातंय.अशातच गणपती विसर्जन मिरवणुकीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांसमोर येणंही टाळलं. त्यात आता ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीतही हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे आहेत.