काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हिदायत पटेल यांच्यावर काल मंगळवारी अकोल्यात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला होता. राजकीय आणि कौटूंबिक वादातून उबेद पटेल या तरूणाने हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. त्यांनतर मारेकरी फरार असून संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री पणज गावातील लोकांनी पकडून दिलं आहे. मात्र आज अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हिदायत पटेल यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
2019 मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह 10 आरोपी होते. हत्या करणारा आरोपी उबेद हा हत्या झालेल्या मतिन यांचा पुतण्या आहे. हिदायत पटेल 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. हिदायत पटेल सध्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. मात्र त्यांच्या या मृत्यूच्या बातमीने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.















