आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. सुनेत्रा अजित पवार यांची गटनेते पदी निवड झालेली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी ठराव मांडला तर छगन भुजबळ यांनी अनुमोदन केले आहे. सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी त्यांचा पक्ष आग्रही आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार आणि नरेश अरोरा हे देखील मुंबईत दाखल झाले आहेत. शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. शनिवारी सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेत आहेत याबाबतची मला कल्पना नसल्याची माहिती शरद पवार यांनी दिली होती. त्यानंतर पवार कुटुंबात नाराजी असल्याचं समोर आलं होतं. शरद पवार यांच्या विधानानंतर पार्थ पवार हे बारामतीमधील शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी दाखल झाले होते. पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
शपथविधीपूर्वी दुपारी विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे रिक्त होणाऱ्या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.















