नसरापूर प्रकरणातील नराधमाला सरकारने कायद्याची प्रक्रिया किंवा कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करून संपवावे, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमावरील पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली.
अशा प्रकरणात सरकार जलदगती न्यायालयाच्या कारवाईची घोषणा करते. मात्र, जलदगती न्यायालय म्हणजे नेमके काय? याची स्पष्ट व्याख्या सरकारने द्यावी, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. अशा घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होते, ही बाब चिंताजनक आहे. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे सांगत त्यांनी कायद्याचा धाक कमी झाला असल्याची खंत व्यक्त केली. नसरापूरमधील आंदोलकांवरील लाठीमाराचा उल्लेख करत, ही तत्परता गुन्हेगारांविरोधात का दिसत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणातील आरोपीला शिक्षा होईलच. मात्र, अशा घटना वारंवार का घडतात, यावर व्यापक विचार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने स्त्री शिक्षण व सक्षमीकरणाचा पाया घातला असताना अशा घटना घडणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय सत्तेची हव्यास, वाढती लालसा, समाजमाध्यमे व ओटीटीवरील कंटेंट यामुळे समाजाची घडी विस्कटत चालली आहे. महाराष्ट्राचे ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ दोन्ही विचलित झाले आहे, असे सांगितले.













Leave a Reply