फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी पहाटे मुंबईत दाखल झाले. आजपासून त्यांच्या भारतातील तीन दिवसीय दौऱ्याला सुरुवात झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून आलेल्या या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेते भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील आणि तिच्या विस्तारावर चर्चा करतील. संरक्षण, तंत्रज्ञान, नवोपक्रम, डिजिटल सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर महत्त्वाच्या चर्चा अपेक्षित आहेत. मॅक्रॉन यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन याही भारतात आल्या आहेत. हा मॅक्रॉन यांचा भारतातील चौथा दौरा असून मुंबईतील हा पहिलाच दौरा आहे.
मॅक्रॉन दाम्पत्याचं मुंबई विमानतळावर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती. मॅक्रॉन यांच्या स्वागतानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर स्वागत संदेश पोस्ट केला. “बिएन्व्हेन्यू अ मुंबई! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष महामहिम इमॅन्युएल मॅक्रॉन आणि प्रथम महिला ब्रिजिट मॅक्रॉन यांचं मुंबईत अत्यंत हार्दिक स्वागत! महाराष्ट्र आपलं स्वागत करतो! राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि फ्रेंच शिष्टमंडळाला यशस्वी आणि आनंददायी शुभेच्छा,” असं फडणवीस यांनी लिहिलंय. भारत दौऱ्यापूर्वी मॅक्रॉन यांनीही एक्सवर पोस्ट करून या भेटीचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. ते व्यावसायिक नेते, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि डिजिटल क्षेत्रातील प्रतिनिधींसह भारतात येत असल्याचं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. भारत हा जवळचा भागीदार असून द्विपक्षीय संबंधांना आणखी मजबूती देण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
मुंबईतील दक्षिण मुंबईतील लोक भवन येथे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेऊन नवीन क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण आणि डिजिटल सहकार्य हे प्रमुख मुद्दे असतील. तसंच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेते मतैक्य करतील.
दौऱ्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे भारत-फ्रान्स नवोपक्रम वर्ष 2026 चं संयुक्त उद्घाटन. या उपक्रमामुळं नवोपक्रम, संशोधन, स्टार्टअप्स आणि लोकांमधील देवाणघेवाणीला चालना मिळेल. दोन्ही नेते व्यावसाय, स्टार्टअप्स, संशोधक आणि नवोपक्रमकर्त्यांना संबोधित करतील. हा उपक्रम दोन्ही देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेणारा ठरणार आहे. मुंबईतील कार्यक्रमांनंतर मॅक्रॉन दिल्लीला रवाना होतील, जिथं ते भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होतील.













