kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

स्थलांतरीत उसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटींचा निधी ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची माहिती

स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दिली.

ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची आस्था वाढीस लावून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी “संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या ४१ तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी ४१ व मुलीसाठी ४१ अशी एकूण ८२ (प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात मुलांसाठी १० व मुलींसाठी १० अशी एकूण २० शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या ८२ शासकीय वसतिगृहापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली २० शासकीय वसतिगृहे वगळता उर्वरित ६२ शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात २ (मुलांचे १ व मुलीचे १) प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) अशी एकूण २२ शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाद्वारे यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींनी शिकले पाहिजे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे असे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि या मुला- मुलींसाठी वसतिगृह बांधण्यासाठी पाठपुरावा केला आणि ते पालकमंत्री असताना अनेक ठिकाणी जागाही निश्चित करण्यात आल्या होत्या. सारथी संस्थेच्यावतीने मराठा समाजातील मुलांसाठी विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहांचे दर्जेदार बांधकाम करावे अशा सूचना दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना वेळोवेळी दिल्या होत्या,अशी माहितीही उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दिली.

ही सर्व शासकीय वसतिगृहे शासकीय इमारतीत सुरु करावयाची आहेत. सद्यस्थितीत केवळ ३ ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध झाल्या असून त्याठिकाणी वसतिगृहांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. उर्वरीत १९ वसतिगृहांपैकी ११ जागा उपलब्ध असलेल्या वसतिगृहांच्या बांधकाम अंदाजपत्रकास आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. यामध्ये पाटोदा, केज, परळी, गेवराई, माजलगाव येथे प्रत्येकी २ (मुलांसाठी १ व मुलींसाठी १) आणि बीड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाचा समावेश आहे.