kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय – राजेंद्र पवार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कालपासून (12 जून) पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, आम्हीही जिद्दी आहोत. जोपर्यंत कर्जमाफीमधील जाचकाठी निघत नाही आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा रोहित पवारांनी घेतला आहे. या आंदोलनास्थळी अनेक शेतकरी देखील उपस्थित आहेत. तसेच रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारही आंदोलनास्थळी उपस्थित आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. रोहित पवारांनी जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलंय किंवा अन्नत्याग केलेला आहे, तर त्यासाठी एक पाठिंबा म्हणून मी इथे बसलेलो आहे. बरेच पत्रकार मला विचारतात की बाप म्हणून काय वाटतं? हा तुमचा कॉमन (नेहमीचा) प्रश्न आहे. माझं असं मत आहे की मी जरी बाप असलो, तरी मी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय. त्यामुळे शेतकरी हाच त्याचा बाप आहे, असं राजेंद्र पवार म्हणाले. कर्जाच्याबाबतीत जर म्हणालात, तर माझं काय आणि त्याचं काय काही केलं तरी कर्ज माफ होणार नाही. रोहित जो बसलाय, ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे. आता यासाठी शेतकऱ्यांनी घरात बसायचं कि इथे येऊन आंदोलनात सहभागी व्हायचं? हे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी ठरवावं, असंही राजेंद्र पवारांनी सांगितलं.