kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार, १२ जणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियात मोठी खळबळ उडाली आहे. दोन बंदुकधारी व्यक्तींनी हा गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे. या दोन हल्लेखोरांपैकी एकाचा गोळीबारातच मृत्यू झाला असून दुसऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

बॉन्डी बीचवर काय घडलं?

सिडनीच्या बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान अचानक दोन व्यक्तींनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये किमान १२ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर बॉन्डी बीचवर मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत काही नागरिक आरडाओरडा करत पळताना दिसत आहेत. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाल्याचंही व्हिडीओत दिसून येत आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

वृत्तानुसार, हा गोळीबार झाला तेव्हा ५० पेक्षा जास्त अंदाधुंद गोळ्या झाडल्याचं सांगितलं जात आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर सिडनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. याबाबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी एक निवेदन जारी करत घटनेची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे.

अँथनी अल्बानीज यांनी निवेदनात म्हटलं की, “बॉन्डी बीचमधील दृश्ये धक्कादायक आणि त्रासदायक आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी लोकांना मदतकार्य करत आहेत. आम्ही एनएसडब्ल्यू पोलिसांसोबत पुढील तपास करत आहोत. या घटनेच्या अधिक माहितीची पुष्टी होताच पुढील अपडेट्स देऊ.”

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात रहिवाशांना न येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच ही घटना कोणी घडवली? या घटनेमागे नेमकी कोणाचा हात आहे? हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार का केला? अशी चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. एका निवेदनात एनएसडब्ल्यू पोलिसांनी म्हटलं की, “पोलिसांची कारवाई सुरू आहे आणि आम्ही लोकांना परिसरात येण्यापासून टाळण्याचं आवाहन करत आहोत.”