महाराष्ट्र विधानसभेतील दोन महत्त्वाच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. बारामती मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत बारामतीकरांनी स्वर्गीय अजित पवार यांना मतपेटीतून आदरांजली वाहताना सुनेत्रा पवार यांना २ लाख, १८ हजार मतांहून अधिक लीड देत भरघोस मतांनी विजयी केले. त्यांनी अजित पवार यांचे मोठ्या मताधिक्क्याचे रेकॉर्डही मोडित काढले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्डही मोडला आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत २४ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांना २ लाख १८ हजार ९३० इतकी मतं पडली. उत्तर प्रदेशच्या साहिबाबाद मधील सुनील कुमार शर्मा यांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी मोडला आहे. २०२२ च्या निवडणुकीत सुनील कुमार शर्मांना २ लाख १४ हजार ८३५ मते मिळाली होती. आता 24 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना बारामती पोट निवडणुकीत २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली आहेत.
निकालानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “आजचा हा निकाल जाहीर होत असताना दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया”












