kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कोकाटे ही हिट विकेट, त्यांनी स्वतः खड्ड्यात उडी मारली, योग्य वेळी केस बाहेर आली – संजय राऊत

शासकीय सदनिका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही मंत्रीपदे काढून घेण्यात आली आहेत. मात्र, कोकाटे यांचे मंत्रिपद पूर्णपणे रद्द करण्यात आलेले नाही. त्यांच्या कडील खात्यांचा कार्यभार काढून घेण्यात आला असून सध्या ते बिनखात्याचे मंत्री आहेत. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधलाय.

काय म्हणाले संजय राऊत ?

संजय राऊत म्हणाले की, कोणाला वाचवायचा प्रयत्न होतो आहे, ज्या अध्यक्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला, सुनील केदार यांच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला, कोकाटे यांचे काय? नार्वेकर असे म्हणतात की, मूळ प्रत येऊद्या. ड्रग्सचे रॅकेट फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रात उद्योगमध्ये मोठी गुंतवणूक येणार आहे, असे फडणवीस म्हणतात, ते हेच उद्योग येणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अमित शाह हे माणसं तोडण्यात पटाईत आहेत. धनंजय मुंडे हे मंत्री होतील का नाही याविषयी मी सांगू शकत नाही. परंतु, त्यांना परत मंत्रीपदी पुन्हा स्थानापन्न करणं हे देवेंद्र फडणवीस यांना सोपं नाही. ज्या पद्धतीने बीडमध्ये संतोष देशमुख यांचा खून झाला, त्या प्रकरणात मुंडे यांचे समर्थन असलेल्या गुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या. याच कारणासाठी त्यांना मंत्रीपदावरून जावे लागले. मग ते कारण अजून संपले का? अजूनही वाल्मीक कराड जेलमध्ये आहे. अजूनही खटला संपलेला नाही. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होते अशांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे पाप देवेंद्र फडणवीस करतील, असे मला वाटत नाही.

दोन मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून गेले आहेत. हा या सरकारला लागलेला काळीमा आहे. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. पैशाच्या बॅगा दाखवत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत, असे असंख्य विषय आहेत. पण, देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील आणि शेवटचा घाव ते मिंध्यांवरच घालतील. कोकाटे ही हिट विकेट आहे. त्यांनी स्वतः खड्ड्यात उडी मारली आहे. ती केस आत्ताची नाही. मात्र, ती योग्य वेळी बाहेर आली आणि ती कसब फडणवीसांमध्ये नक्कीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.