kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!

छत्रपती संभाजीनगरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) गाझा आणि पॅलेस्टाईनमधील लोकांना मदत करण्याच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सय्यद बाबर अली सय्यद महमूद अली या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने धार्मिक आणि मानवतावादी भावनांचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल केली असल्याचे उघड झाले आहे.

एटीएसच्या तपासात समोर आले की, सय्यद बाबर अलीने ‘अहमद राजा फाउंडेशन’ या नोंदणीकृत नसलेल्या संस्थेच्या नावाने बनावट क्यूआर कोड तयार करून नागरिकांकडून निधी गोळा केला. याशिवाय ‘राजा एम्पॉवमेंट फाउंडेशन’ या नोंदणीकृत पण विदेशात निधी पाठवण्याचा अधिकार नसलेल्या संस्थेच्या नावानेही देणग्या जमा करण्यात आल्या. या रकमा तो स्वतःच्या बँक खात्यात जमा करून व्यक्तिगत आर्थिक फायदा मिळवत होता. त्याने ‘राजा एम्पॉवमेंट फाउंडेशन’ नावाचा यूट्यूब चॅनल सुरू करून त्याच्या माध्यमातून लोकांकडून ऑनलाइन देणग्या मागवण्याचा कट रचला होता.

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सय्यद बाबर अलीने आपल्या खात्यातून GOFUNDME.COM या आंतरराष्ट्रीय देणगी पोर्टलवरून 14 ट्रान्झॅक्शनद्वारे तब्बल ₹10,24,220 इतकी रक्कम परदेशात पाठवली आहे. ही रक्कम नेमकी कुणाकडे आणि कोणत्या हेतूने पाठवण्यात आली, याचा तपास आता एटीएस आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे करत आहेत. या कारवाईमुळे परदेशी निधीच्या नावाखाली फसवणूक आणि संशयास्पद व्यवहारांच्या जाळ्याचा मोठा पर्दाफाश झाल्याचे मानले जात आहे. एटीएसकडून पुढील काही दिवसांत आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर महाराष्ट्रात अलर्ट देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसकडून राज्यात ठिकठिकाणी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. दिल्ली स्फोटाचे धागेदोर महाराष्ट्रात असण्याच्या संशयावरून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. स्फोट प्रकरणात अटक केलेल्या चार डॉक्टरांचे महाराष्ट्रात काही संबंध आहेत का? याचा देखील शोध सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरं आणि गावांमध्ये एटीएसची शोधमोहीम सुरू आहे. अटकेतील डॉक्टर महाराष्ट्रात आले होते का? या अनुषंगाने एटीएसकडून तपास केला जात आहे. डॉ. मुजम्मिल शकील, डॉ. आदिल अहमद, डॉ. अहमद सय्यद आणि डॉक्टर शाहीन शाहिद या चार जणांना अटक करण्यात आली आहे.