kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

Nikki Murder Case : निक्कीच्या आईने गेल्या ९ वर्षात जावई विपिनने काय काय केले याचा केला खुलासा

ग्रेटर नोएडामधील निक्की हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात तिच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या आईला कशा प्रकारे मारले गेले याचे वर्णन केले आहे. निक्कीच्या आईनेही आता नवे खुलासे केले आहेत. तिने लेकीच्या लग्नाच्या ९ वर्षांदरम्यान जावई विपिन भाटीने हुंड्यासाठी निक्कीला कशा प्रकारे छळले याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.

कासना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निक्की हत्याकांडाबाबत एकामागून एक नवे खुलासे समोर येत आहेत. मृतकेच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या वडिलांच्या कृत्यांचा पर्दाफाश केला आहे. मुलाने सांगितले, “पप्पांनी मम्मीवर आधी काहीतरी ओतले, मग मम्मीच्या कानाखाली मारली आणि लायटरने आग लावली.” याशिवाय, निक्कीच्या आईने जावई विपिनबद्दल जे काही सांगितले, ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

निक्कीच्या आईने सांगितले की, लग्नात हुंडा म्हणून स्कॉर्पियो गाडी दिली होती. तरीही रोज नव्या मागण्या केल्या जात होत्या. ती म्हणाली, “आम्हाला फक्त रक्ताच्या बदल्यात रक्त हवे आहे. आधी स्विफ्ट डिझायर कार मागितली होती. मग स्कॉर्पियो मागितली. आम्ही स्कॉर्पियो दिली. तरीही जावई कधी एक लाख रुपये मागायचा, तर कधी दोन लाख रुपये मागायचा. त्याचे एकच काम होते – फिरणे आणि मुलींना फिरवणे. लग्नाला ९ वर्षे झाली आहेत.”

आईने पुढे सांगितले, “आम्ही जावई विपिन भाटीच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. त्याच्या सांगण्यावरून त्याला बुलेट बाइकही दिली, जेणेकरून तो आमच्या मुलीला त्रास देणार नाही. ती तिथे सुखाने राहावी. जेव्हा माझ्या मुलीला जिवंत जाळले गेले, तेव्हा फक्त पाच मिनिटांपूर्वी माझे निक्कीशी बोलणे झाले होते. ती म्हणत होती, ‘मम्मी, मी आजच घरी येऊ का? हे लोक मला मारतील.’ त्यांनी निक्कीला मारहाण केली. ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर केमिकल टाकून आग लावली आणि माझ्या मुलीला मारले.”