लाहोरमधील लिबर्टी गार्डनमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त एक भलामोठा केक ठेवण्यात आला होता. हा केक कापून स्वातंत्र्यदिन सेलिब्रेट करण्याचा तेथील राजकीय नेत्यांचा मनसुबा होता. पण घडलं भलतंच. लोकांनी कार्यक्रम सुरू होण्याआधीच तो केक पळवला. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ पाहून जगभरातील नेटकरी त्यांची खिल्ली उडवत आहेत.
नेमकं काय घडलं?
हा व्हिडीओ hamzavloger_120 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त लिबर्टी गार्डनमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चांगली सजावट केली होती. लायटिंग वगैरे लावली होती. गाणी-डान्स, नाटकं असे काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार होते. तसंच, ज्या क्रांतिकारकांमुळे ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं, त्यांच्या बलिदानाला अभिवादन केलं जाणार होतं. पण लोकांना या गोष्टीशी काहीच घेणं-देणं नव्हतं. लोकं फक्त केक खाण्यासाठी गोळा झाली होती.
पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाच्या रंगातील मोठा केक त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. अन् लोकांची वाढती गर्दी पाहून केक कटिंग सोहळा वेळेआधीच सुरू झाला. अन् काय सांगता, लोकांनी अक्षरशः आयुष्यात कधीच केक पाहिला नसेल, अशा आवेशात मिळेल तितका केक पळवून नेला. लोकं अगदी कपड्यांमध्ये, खिशात, पिशव्यांमध्ये, टोपीमध्ये केक भरून पळ काढत होते. ही दृश्यं पाहून जगभरातील लोकं हैराण झाली आहेत. लोकं त्यांची खिल्ली उडवत आहेत.













