सोमवारी दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये ७.४ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. यामुळे पश्चिम कोलंबियातील शहरांमध्ये किमान २० जण ठार झाले असून डझनभर इमारती कोसळल्या आहेत. अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले, तर अनेकजण जखमी झाले. राजधानी बोगोटापर्यंतच्या नागरिकांना आपली घरं सोडून बाहेर पडावं लागलं.
यू. एस. जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) आणि कोलंबियाच्या संबंधित संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू बोगोटापासून पश्चिमेकडं ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या चोकोमधील ‘सॅन होजे डेल पाल्मार’ (San Jose Del Palmar) येथे होता. या भागात सुमारे ४,८०० नागरिक राहतात. हा भूकंप जमिनीखाली १०७ किलोमीटर खोलीवर झाला. या भूकंपाचे धक्के शेजारील इक्वेडोरमध्येही जाणवले. परेरा (Pereira) शहरात किमान १८ आणि मनिझालेस (Manizales) शहरात दोन जण ठार झाले, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
या भूकंपामुळे देशाच्या पश्चिम भागातील शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. ‘आफ्टरशॉक्स’ची (मुख्य भूकंपानंतर येणारे धक्के) भीती असतानाही रहिवासी ढिगाऱ्यातून आपापल्या वस्तू शोधताना दिसत होते. कोलंबियातील तिसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या ‘काली’ (Cali) येथील ६४ वर्षीय टॅक्सी चालक जॉर्ज मोनकायो यांनी सांगितलं की, “भूकंपामुळे इमारती कोसळत असताना त्यांना डोंगरावरील आपल्या घरातून शहरात धुराचे लोट वर उडताना दिसले. सोमवारी सकाळी शहरातील रहिवासी आणि बचाव पथक कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यात शोधकार्य करत होती. माझं संपूर्ण घर हादरलं, इतक्या शक्तिशाली भूकंपाचा अनुभव मी यापूर्वी कधीच घेतला नव्हता,” असं त्यांनी सांगितलं.
कोलंबियातील कॉफी उत्पादक डोंगराळ भागात वसलेल्या मनिझालेस शहरात, निओ-गोथिक शैलीतील कॅथेड्रलचा (महाचर्च) एक मनोरा कोसळून मुख्य सभागृहाच्या भागावर पडला. मनिझालेसचे महापौर जॉर्ज एडुआर्डो रोजास यांनी सांगितलं की, “शहरात भूकंपामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र रहिवाशांना आफ्टरशॉक्सच्या शक्यतेमुळे घराबाहेर राहण्यास सांगितलं.” चोकोच्या गव्हर्नर नुबिया कॉर्डोबा यांनी सोशल मीडियावर नमूद केलं की, “प्रादेशिक राजधानी असलेल्या ‘क्विबडो’ (Quibdó) शहरात लोक जखमी झाले आहेत. इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे.”













