उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील उड्डाणपुलांच्या ‘रिसरफेसिंग’चे तातडीचे आदेश दिले असले तरी त्यामागे कामापेक्षा भ्रष्टाचाराचा खडा टक्का आणि आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय खटाटोप अधिक दिसतो, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.
“मुंबईत रस्ते, उड्डाणपुलं, पायाभूत सुविधा या सगळ्यांची दशा अत्यंत वाईट आहे. पावसाळ्यानंतर दुरुस्ती ‘तातडीची’ असतेच, पण दरवर्षी तेच आदेश आणि तेच ढिसाळ काम… फरक फक्त एवढाच कंत्राटदार बदलतात आणि टक्केवारी वाढते.”
ते पुढे म्हणाले की,
“उपमुख्यमंत्री महोदयांनी अचानक फेब्रुवारीची डेडलाइन जाहीर करून स्वतःला ‘कामसू’ दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी मुंबईकरांना हे सारे निवडणुकीपूर्वीचे नाट्य असल्याचं चांगलं कळतं. कंत्राटदारांकडून कोणाला किती परतावा मिळणार यासाठीच ही तातडी दाखवली जात आहे.”
उड्डाणपुलांचा तांत्रिक अहवाल न पाहता थेट रिसरफेसिंगच्या सूचनांमागे संशयास्पद घाई. निवडणूक जवळ आल्यावरच विकासकामांचा सूडौल पाऊस, बाकी वर्षभर शून्य कामगिरी.
‘गुणवत्ता नियंत्रण कक्ष’ हा नावापुरता उपक्रम प्रत्यक्षात कामाचा दर्जा खालावलेला, खर्च मात्र वाढलेला.महापालिका हस्तांतरण प्रक्रियेतील मुद्दे न सोडवता राजकीय शोबाजी आणि फोटोंचा खेळ सुरू.शहरातील रस्त्यांची दुरवस्था वाढल्यावरही जबाबदार विभागांवर शून्य कारवाई.
ॲड. मातेले यांनी स्पष्ट इशारा दिला.“मुंबईकरांच्या पैशाचा हिसका चालवणारी सरकार कंत्राटदारांची साखळी आम्ही उघड करणार. जनतेसाठी काम नव्हे; तर कंत्राटांसाठी राजकारण हा सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा अजेंडा आहे.”













