kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अंतिम निर्णय शरद पवार घेतील; पहा खा. सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या

आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढविण्यासंदर्भात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. स्थानिक पातळीवर त्यासंदर्भातील चर्चा सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) यांना बरोबर घेत निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न आहे. त्यासंदर्भातील अंतिम निर्णय शरद पवार घेतील,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे बुधवारी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत निवडणुकीचा आढावा घेतला. त्यानंतर सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवार या दोघांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आघाडीने निवडणूक लढविणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या दोन्ही पक्षातील स्थानिक नेतेही निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार असल्याचे सांगत आहेत. यासंदर्भात सुळे यांच्याकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या,‘अजित पवार यांच्याशी माझी भेट झालेली नाही.

आघाडी करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मी कोणलाही भेटायला तयार आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करूनच मी अजित पवार यांच्याशी संवाद साधणार आहे. मात्र आघाडीसंदर्भातील कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेले नाही. आघाडीसंदर्भातील शंकांचे पूर्ण निरसन होत नाही. तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. यासंदर्भातील सर्व जबाबदारी माझी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) ‘घड्याळ’ या पक्ष चिन्हावर निवडणूक लढविण्यासंदर्भातील चर्चेची माहिती नाही.’

‘पुण्याच्या विकासासाठी एकत्र येत निवडणूक लढविली पाहिजे. त्यासंदर्भात पक्षांमध्ये चर्चा झाली पाहिजे. त्यादृष्टीने महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढविण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. पुण्यात बदल हवा असेल तर, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन निवडणूक लढविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे,’ अशी भूमिकाही सुळे यांनी मांडली.