kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

उन्नाव बलात्कार प्रकरण: कुलदीप सेंगरची शिक्षा स्थगित

उन्नाव बलात्कार प्रकरणी 2019 साली न्यायालयाने (ट्रायल कोर्ट) भाजपचे माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर 6 वर्षांहून अधिक काळानंतर मंगळवारी (23 डिसेंबर) दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने त्याची शिक्षा स्थगित केली आहे.न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन यांच्या खंडपीठाने माजी आमदाराला 15 लाख रुपयांच्या पर्सनल बाँडवर आणि तेवढ्याच रकमेचे तीन जामीनदार सादर करण्याचे आदेश दिले आहेत.सेंगरची शिक्षा स्थगित केल्यानंतर काही तासांतच मंगळवारी या प्रकरणातील सर्व्हायवर तरुणी, तिची आई आणि महिला हक्क कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी इंडिया गेटवर आंदोलन केलं.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिया गेट परिसरात आंदोलनात बसलेल्या सर्व्हायवरने म्हटले आहे की, ‘2027 मध्ये होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सेंगरला जामीन देण्यात आला आहे.’हा निर्णय ऐकून आपल्याला मोठा धक्का बसल्याचं तिने सांगितलं.माझ्यावर ‘अन्याय’ झाला असून निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याच्या पत्नीला निवडणूक लढवता यावी यासाठीच सेंगरला जामीन देण्यात आला असल्याचे संबंधित मुलीने म्हटलं आहे.’अशा गंभीर आरोपांचा व्यक्ती मोकळा राहिल्यास आपल्याला सुरक्षा कशी मिळणार,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.सेंगरच्या सुटकेनंतर आपल्याला ‘भीती’ वाटत असल्याचं सांगत सेंगरचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी संबंधित मुलीने केली आहे.न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं सांगत, या प्रकरणात आपण सर्वोच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे पुढे तिने म्हटले.

सर्व्हायवरने काय म्हटलंय?

सर्व्हायवरने बुधवारी(24 डिसेंबर) पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तिला तुरुंगात पाठवलं पाहिजे.

ती म्हणाली, “या निर्णयानं मला खूप वाईट वाटलं आहे. जर आरोपीला सोडायचं असेल तर मला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला तुरुंगात पाठवलं पाहिजे. मी तुरुंगात सुरक्षित राहीन.”

दरम्यान, सर्व्हायवरच्या आईनं बुधवारी(24 डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना दावा केला की त्यांच्या मुलीला निषेधादरम्यान ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना न्याय हवा आहे.

त्या म्हणाल्या, “सीआरपीएफची गाडी माझ्या मुलीला ताब्यात घेऊन गेली आहे आणि माझी न्यायालयाला एकच विनंती आहे की कुलदीप सेंगरचा जामीन रद्द करावा. आम्ही सुरक्षित नाही. माझी मुलं अजूनही आंदोलनाला बसली आहेत. मला न्याय हवा आहे.”