उत्तर प्रदेशातील वाराणसी शहर हे सध्या चांगलंच चर्चेत आहे. सध्या वाराणसीमध्ये विकासाची अनेक कामे वेगाने सुरू आहेत. याच कामांचा एक भाग म्हणून ऐतिहासिक मणिकर्णिका घाटाचाही कायापालट केला जात आहे. स्थानिक लोकांच्या मते, या कामासाठी जुनी बांधकामे पाडण्यात आली आहेत आणि या तोडफोडीमुळे तिथल्या लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेकांनी याठिकाणी असलेला इंदूरच्या होळकर घराण्यातील महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळाही तोडण्यात आला आहे, असा आरोप केला आहे. मात्र, वाराणसीचे महापौर अशोक तिवारी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महापौरांच्या म्हणण्यानुसार, “तो पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवला असून, घाटाचे काम पूर्ण झाले की तो पुन्हा सन्मानाने बसवला जाईल.”
काशीच्या पाल समाजाचे अध्यक्ष महेंद्र पाल सांगतात की
अहिल्याबाई होळकरांचा पुतळा तोडल्याच्या बातमीमुळे परिसरात मोठा गदारोळ झाला आणि लोकांनी जोरदार निदर्शने केली. याप्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यातही घेतले आहे. या आंदोलनात सहभागी झालेले काशीच्या पाल समाजाचे अध्यक्ष महेंद्र पाल सांगतात की, “अहिल्याबाई होळकर आमच्या पूर्वज होत्या आणि त्या पाल समाजाचा मान होत्या.”
त्यांनी पुढे दावा केला की, “आम्ही स्वतः तिथे जाऊन पाहिले, तेव्हा सरळ जेसीबी (JCB) लावून पुतळा तोडण्याचं काम सुरू होतं. आपल्या दैवताचा असा अपमान झालेला पाहून आम्ही विरोध केला, पण पोलिसांनी आम्हाला अडवलं आणि तिथे फिरकूही दिलं नाही.'”
वाराणसीचे महापौर अशोक तिवारी म्हणतात की,
वाराणसीचे महापौर अशोक तिवारी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.”सर्व मूर्ती आम्ही सुरक्षित जपून ठेवल्या आहेत आणि घाटाचं काम पूर्ण झालं की त्या पुन्हा बसवल्या जातील,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
महापौरांनी पुढे सांगितलं की, “मणिकर्णिका घाटाचा कायापालट करून तिथे आधुनिक सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी अंत्यसंस्कारासाठी 38 नवीन प्लॅटफॉर्म बांधले जात असून तिथे धुरासाठी चिमण्यांची सोय असेल. यामुळे पावसाळ्यातही अंत्यसंस्कार करणं सोपं होईल.
महापौर अशोक तिवारी यांनी पुढं म्हटलं की, “अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांसाठी सोयीचे रॅम्प, बसण्यासाठी प्रतीक्षालय आणि पाहण्यासाठी व्ह्यूविंग गॅलरी बांधली जाणार आहे. लाकडं वाहून नेण्यासाठी वेगळा रस्ता, नोंदणी कार्यालय आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याचीही सोय केली जाईल.
खुद्द ‘डोमराजा’ यांच्या विनंतीवरूनच पंतप्रधानांनी या कामाला सुरुवात केली आहे, असा दावा महापौरांनी केला आहे.
मणिकर्णिका घाटावर रात्रंदिवस अंत्यसंस्कार सुरू असतात आणि या अंत्यसंस्काराचे विधी करणाऱ्या समाजाच्या प्रमुखाला ‘डोमराजा’ असं संबोधलं जातं.
वाद वाढल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः वाराणसीचा दौरा केला
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाद वाढल्यानंतर स्वतः वाराणसीचा दौरा केला. “एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काही खोटी चित्रं मुद्दाम व्हायरल केली जात आहेत,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
“यापूर्वी जेव्हा ‘काशी विश्वनाथ धाम’चा विकास होत होता, तेव्हाही असेच कट रचले गेले होते. बाहेरून तुटलेल्या मूर्ती आणून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता. आताही मणिकर्णिका घाट आणि दालमंडीच्या कामांबाबत तशाच अफवा पसरवल्या जात आहेत,” असं आदित्यनाथ म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं की, कोणत्याही मूर्तीची तोडफोड झालेली नाही आणि सर्व धार्मिक प्रतीकं पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांच्या मते, “पूर्वी काशीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या कमी होती, पण आता ती प्रचंड वाढली आहे. ‘एआय’च्या मदतीने खोटे व्हिडिओ बनवून लोकांच्या भावनांशी खेळणं कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही,” असा कडक इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणानंतर पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निघालेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांनाही पोलिसांनी वाटेतच रोखलं.













