अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे नवी मुंबईपासून ते गडचिरोली, वाशीम यासारख्या जिल्ह्यांमध्येही घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस बुकिंग करूनही सिलिंडर मिळवण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. दुसरीकडे राज्यात एलपीजीचा पुरेसा साठा आहे, असा दावा केला जात आहे. राज्य सरकारच्या या दाव्यानंतर आता माजी मुख्यमंत्री तथा आमदार उद्धव ठाकरे यांनी सरकारला चांगलेच घेरले आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
सरकार एलपीजी गॅस सिलिंडरची टंचाई नाही असे म्हणत आहे. मग रस्त्यावर सिलिंडरसाठी टंचाई का दिसत आहे. मला तर माहिती मिळाली आहे की फक्त मुंबईतीलच 30-40 टक्के रेस्टॉरंट्स बंद होत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे सामान्य जनता होरपळत असेल आणि ही बाब जर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत असेल तर त्यांच्या यंत्रणेत गलथानपणा आहे. जी व्यक्ती जनतेची व्यथा जाणून घेत नाही किंवा व्यथा समजूनही असं काहीच नाहीये, असं मुख्यमंत्री म्हणत असतील तर राज्याचं कठीण आहे. शेवटी गॅस टंचाई आणि महागाई यात फरक आहे. गॅसची किंमत का वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला गॅस निर्मितीचा एक प्रयोग करून पाहिला आहे. परंतु गॅस टंचाई होतच आहे. असे का होत आहे, ते सरकारने सांगावे, असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.
दुसरीकडे विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधकांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळेच आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यामुळे आता भविष्यात विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












