पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वातावरण तणावपूर्ण झाले आहे. भाजपाचा मोठा विजय आणि तृणमूल काँग्रेस १५ वर्षांनंतर सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पश्चिम बंगालच्या अनेक भागांतून हिंसाचार, तोडफोड आणि संघर्षाच्या बातम्या समोर आल्या. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकांवर गोळीबार केल्याची मोठी घटना समोर आली आहे. या गोळीबारानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांचे निकटचे सहकारी चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाला. ही घटना मध्यमग्राममध्ये घडली, जिथे चंद्रनाथ रथ यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. ते हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, तेथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे अनेक नेते, पदाधिकारी रुग्णालयात दाखल होत आहेत. तसेच या हल्ल्याच्या मागे टीएमसी कार्यकर्ते असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
चंद्रनाथ रथ यांची कार रस्त्याच्या मधोमध थांबवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या छातीत आणि डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच सुवेंदू अधिकारी पूर्व मिदनापूरहून कोलकात्याकडे रवाना झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. संशयितांना ओळखण्यासाठी पोलीस जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. चंद्रनाथ रथ यांचा चालकही या हल्ल्यात जखमी झाला आहे. या चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत २०० हून अधिक गुन्हे दाखल झाले असून ४३३ लोकांना विविध प्रकरणांत अटक करण्यात आली आहे. याशिवाय वेगवेगळ्या कलमान्वये ११०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.













Leave a Reply