‘टाइमलाइन’ हे पुस्तक केवळ विचार संकलन, भावनांचा प्रवाह मांडणारे नसून समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱ्यांसाठी यम-नियम स्पष्ट करणारे अभिनव धाटणीचे, धाडसी व अद्वितीय पुस्तक असल्याचे मत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी येथे व्यक्त केले. शेलार यांनी ‘जंतर मंतर’चा उल्लेख करून पुस्तकातील काही उल्लेखांचा दाखला दिला व दर्डा यांनी अचूक टायमिंग साधल्याची टिप्पणीही केली.
प्रभावी समाजमाध्यमे आभासी चित्र निर्माण करून माध्यमे खऱ्याचे खोटे किती बिनदिक्कतपणे करू शकतात, जे कधी नाही, नव्हते, ते कायमचे होते, असे सांगून बलाढ्य लोकशाही कशी पोखरून नेतात, याचा उल्लेख पुस्तकात आहे. समाजमाध्यमे आता विद्वेषाचे, वैचारिक खून, राजकीय नॅरेटिव्ह तयार करण्याचे आणि सरकारे पाडण्याचे शस्त्र बनले आहे, असेही पुस्तकात नमूद असल्याचे शेलार यांनी सांगितले. पुस्तकातील हे लिखाण सद्यस्थितीला व जंतर मंतरलाही लागू होते का, असा सवाल त्यांनी केला.
पूर्वी कोणी कोरीव काम केले, दगड, ताम्रपटावर लिहिले आणि नंतर छापील पुस्तके आली. आता समाजमाध्यमांचा काळ असून डिजिटायझेशनचे डॉक्युमेंटेशन करणारे हे पुस्तक आहे. एका अर्थाने आजच्या डिजिटायझेशनच्या युगातील दस्तऐवजीकरणाचा दीपस्तंभ आहे. साधनशुचितेच्या आजच्या भाषेत समाजमाध्यमांच्या युगातील नवीन प्रमेय मांडण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण व कौशल्यपूर्ण बांधणीचे विषय त्यांनी निवडले आहेत, असे शेलार यांनी नमूद केले.













Leave a Reply