kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“या अदानी कराला माझा विरोध” ; मुंबईकरांवरील मालमत्ता करावरून आदित्य ठाकरे यांचा मुंबई महापालिका तसेच फडणवीस सरकारला टोला !

नुकतेच मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने सुधारित रेडी रेकनर दरानुसार मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात सुमारे 15 टक्के वाढ केली आहे. या वाढीव दरानुसार पालिकेने मालमत्ताधारकांना देयके पाठवली आहेत. तर दुसरीकडे, घनकचरा व्यवस्थापन शुल्क स्थगित करण्यात आले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका तसेच फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

मुंबई महापालिकेने सुधारित रेडी रेकनर दरानुसार मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात 15.89 टक्के दरवाढ केली आहे. त्याद्वारे महापालिकेला अंदाजे 930 कोटी रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळणार आहे. तर, मालमत्ता करामधील या सुधारित देयकांमुळे नागरिकांवर पडणारा अतिरिक्त भार लक्षात घेऊन प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन शुल्काचा पुनर्विचार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन शुल्क स्थगित ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलेला आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका तसेच फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. याबाबत त्यांनी एक्स पोस्ट देखील केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे ?

@mybmc ने कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क फक्त “पुढे ढकलले” आहे आणि रद्द केलेले नाही.

का?

⛔️ कारण बीएमसीने मुंबईसाठी मालमत्ता कर वाढवला आहे.

मी या कचरा व्यवस्थापन शुल्काला (अदानी कर) माझा विरोध व्यक्त करत आहे.

अदानी समूहाच्या देवनार स्वच्छतेवर होणाऱ्या २५०० कोटी रुपयांच्या खर्चाची अप्रत्यक्ष भरपाई करण्यासाठी मुंबईकरांवर हा कर आकारला जाणार आहे.

🚨 उद्धव ठाकरेजींच्या सरकारने मुंबईतील ५०० चौरस फूट घरांसाठी मालमत्ता कर बिनशर्त रद्द केला.

⚠️ आता, भाजप सरकार मालमत्ता कर वाढवत आहे आणि लवकरच अदानी कर (कचरा व्यवस्थापन शुल्क) ने सुरुवात करेल.

मुळात, मुंबईला मोठ्या प्रमाणात कर आकारून आणि गोंधळात टाकून – ही भाजपची रणनीती आहे.