मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांतील २ हजार ९६९ जागांसाठी आज मतदान होत आहे. १५ हजार ९३१ उमेदवारांचे आज भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मुंबईमध्ये एक सदस्यीय प्रभाग असल्याने मुंबईकरांना एकच मत द्यायचं आहे, तर उर्वरित २८ महापालिकांमध्ये बहुदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने तेथे मतदारांना चार मते द्यावी लागणार आहेत. दरम्यान, राज्यात मतदानाला सुरुवात झाली असून सर्वच मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०७.३० ते सकाळी ०९.३० पर्यंत ६.२३% मतदान झाले. नांदेड -वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीसाठी २० प्रभागातून ८१ जागांसाठी ४९१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली, यावेळी सकाळ पासूनच मतदारांत उत्साह पहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊ पर्यंत सरासरी ७.१६ मतदान झालै आहे.एकुण पाच लाख १७९९ मतदारां पैकी पहिल्या टप्प्यात दोन तासात ३५९५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर जाताना दिसत आहेत तर कांही ठिकाणी उमेदवार, कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी घराबाहेर पडा असे आवाहन करत अॅटो व कार, दुचाकी व इतर वाहनांनी त्यांना मतदान केंद्रावर पोहंचविण्याची व्यवस्था करत आहेत.
सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदानास सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांत एकूण ६.४५ टक्के मतदान झाले असून पुढील तासांत मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. मतदान केंद्रांबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी असून मतदारांना ने-आण करण्यासाठी खासगी वाहने वापरली जात आहेत. ज्येष्ठ, महिला व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासात, सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ७.८७ टक्के मतदान झाले. १२ हजार ६०८ पुरुष मतदार तर ११ हजार ५६७ महिला मतदार अशा एकूण २४ हजार १७५ मतदारांनी मतदान केले. मतदान शांततेत सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी सारसनगर उपनगरातील मतदान केंद्रावर मतदान केले.
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीस आज सकाळी शांततेत प्रारंभ झाला. सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत शहरात एकूण ५.५१ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, या कालावधीत १३ हजार ८७५ पुरुष, नऊ हजार ८४० महिला तसेच १२ इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण २३,७२७ मतदारांनी मतदान केले आहे. सकाळच्या वेळेत मतदान केंद्रांवर तुलनेने कमी प्रतिसाद दिसून आला असला, तरी पुढील तासांत मतदानाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज असून, सर्व मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.















