राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी काल राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानासंदर्भात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. आज या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यास काही तास राहिले असताना रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत हे आरोप केले आहेत.
आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, “काही वेळातच मतमोजणीला सुरवात होईल, तरीही निवडणूक आयोगाने मुंबईसह अनेक महापालिकांच्या मतदानाची अधिकृत टक्केवारी अद्यापही जाहीर केलेली नाही. निवडणूक आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कोणाचा बसवायचा याचे आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी जाहीर करण्याचे टाळले जात नाही ना? आता टक्केवारी जाहीर करायची की नाही हे निवडणूक आयोगाने ठरवावे, पण किमान आम्ही भाजपाची बी टीम आहोत हे तरी मग जाहीर करावं!”
काल मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी शांततेत मतदान पार पडले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत राज्यभरात ४६-५० टक्के मतदान झाले, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पीटीआयला सांगितले.
दुपारी ३:३० वाजेपर्यंत, कोल्हापूरमध्ये ५०.८५ टक्के मतदान झाले. त्यानंतर मुंबईत ४१.०८ टक्के , पुण्यात ३६.९५ टक्के, नागपूरमध्ये ४१.२३ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४३.६७ टक्के आणि नाशिकमध्ये ३९.६४ टक्के मतदान झाले होते.
गुरुवारी झालेल्या महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत मतदान शांततेत पार पडले असले तरी, निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यापासून आयोगाने घेतलेल्या अनेक निर्णयांवर मतदार आणि विरोधी पक्षांकडून टीका झाली आहे. या निवडणुकीत राज्यातील नगरसेवकांच्या २,८६९ जागांसाठी २९ महानगरपालिकांमध्ये १५,९३१ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मतदानाच्या काही दिवस एक बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी मतदार यादी, मतदान केंद्रांची व्यवस्था आणि २३ मतमोजणी केंद्रांची माहिती आणि मतमोजणी प्रक्रियेत PADU (Printing Auxiliary Display Unit) या नवीन मशीनचा वापर याबाबत माहिती दिली होती.
मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीदरम्यान बॅकअप म्हणून पाडू या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. यावरही शिवसेना (ठाकरे), आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला होता.
राज ठाकरेंनीही या मशीनवर आक्षेप घेतला होता. “या मशीनची कोणत्याही राजकीय पक्षाला माहिती दिलेली नाही. ते मशीन आम्हाला दाखवले गेलेले नाही. उद्धव ठाकरेंच्या नावाने आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल पत्र लिहिले आहे. हे मशीन राजकीय पक्षांना का दाखवले गेले नाही, हे मशीन काय आहे? राजकीय पक्षांना याची माहिती द्यावीशीही त्यांना वाटत नाही. निवडणूक आयुक्त वाघमारे यावर उत्तर द्यायला तयार नाहीत. अर्थात आताच्या सरकारने वाघ कधीच मारून टाकला आहे”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.















