kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मविआच्या ‘जोडे मारो’ आंदोलनावर अजित पवार संतापले, म्हणाले ….

मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला. या घटनेचा निषेध करत मविआतील प्रमुख नेत्यांनी राज्यात जोडे मारो आंदोलन केले. त्यात मुंबईच्या गेट ऑफ इंडिया इथं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. यावरूनच अजित पवार चांगले संतापले आहेत. तुमच्यात धमक असेल तर समोरासमोर या ना…हा कसला रडीचा डाव खेळता असा टोला अजितदादांनी उद्धव ठाकरेंसहमहाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.

बारामतीत जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले की, काहींनी जोडे मारो आंदोलन केले त्यात एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि मी अशा फोटोला चप्पलेने मारले. अरे असं कशाला जोडे मारता, असेल धमक तर या ना समोरासमोर, मग बघतो ना. हा कसला रडीचा डाव? एखाद्या महापुरुषाचा पुतळा आपल्या काळात उभारलेला असताना तो पडावा असं कुठल्या तरी सरकारला वाटेल का? कुणालाच वाटणार नाही, पण त्यात राजकारण, वेगवेगळ्या टीकाटिप्पणी, आम्हीही मूक आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देत याचा तपास करावा अशी मागणी केली असं त्यांनी सांगितले.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यापूर्वी बसवलेला त्याचे नुकसान झाले. जे घडायला नको ते घडले. ही दुर्दैवी घटना होता कामा नये. आमच्याही मनाला लागलं. अहमदपूर येथे सभेत मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागितली. या घटनेत ज्याची चूक असेल त्याला शोधून काढू. कोणाची तरी चूक असेल त्याला शोधायचे, त्याला शासन करायचे आणि पुन्हा तिथे महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक उभारायचे. मी स्वत: तिथे गेलो. देखावा न करता तिथल्या बांधकामाची बारकाईनं पाहणी केली. राजकारण करू नका असंही अजित पवारांनी म्हटलं.

दरम्यान, लोकसभेत संविधान बदलणार, घटना बदलणार असं कुणी सांगितले ते लोकांना खरे वाटले. सगळ्या जातीजमातीतील लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आम्ही यात कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही मला ५ वर्ष निवडून दिले. मी ५ वर्षात काय केले याचे पुस्तक तुम्हाला देणार आहे. जर आपण काय केले हे सांगितले नाही तर लोक विसरून जातात. आज बारामतीत ज्या सुविधा येतायेत त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. प्रशासनावर तुमची पकड असावी लागते. पाठपुरावा करावा लागतो. मी ३०-३५ वर्ष राजकीय सभा घेतोय पण यावेळी जाईल तिथे प्रचंड गर्दी होतेय. महिलांची संख्या अधिक आहे. भावाच्या नात्याने सांगतो, बहिणींना कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही असा विश्वास अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला.