राजकारणात पदार्पण केलेल्या सुपरस्टार विजयच्या अडचणी संपण्याचे काही नाव घेत नाहीत. करुर येथील चेंगराचेंगरीत ४१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा त्याच्या रॅलीत दुर्घटना घडली आहे. तमिळनाडू येथील सेलमच्या रॅलीत महाराष्ट्रातील ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या रुग्णालयाबाहेर पत्रकार आणि तमिलगा वेत्री कझगम पक्षाचे कार्यकर्ते भिडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील सेलम येथे तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाच्या वतीने रॅलीच्या आयोजन करण्यात आले होते. सुपरस्टार विजय या रॅलीसाठी हजेरी लावली होती. यावेळी सूरज (वय ३७) या तरुणाचा मृत्यू झाला. सूरजचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. रॅलीत सूरज खाली कोसळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सेलम येथे रुग्णालयाबाहेर जमा झालेल्या पत्रकार आणि पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही गटात हामरीतुमरी झाल्याचे पाहायला मिळाले. आक्रमक झालेल्या दोन्ही गटांना शांत करण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केल्याचे व्हिडिओत दिसून येते.
#WATCH | Tamil Nadu: Visuals from outside the hospital, in Salem, where a scuffle broke out between some journalists and TVK cadres. The journalists alleged that the cadres tried to attack them. More details awaited.
A 37-year-old man from Maharashtra, identified as Suraj, died… pic.twitter.com/8Adf8VxHmN
— ANI (@ANI) February 13, 2026
पोलिसांनी काय दिली माहिती?
रॅली सुरु असताना सूरज अत्यवस्थ होऊन खाली कोसळला त्यानंतर लगेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विजयच्या २७ सप्टेंबर २०२५ रोजी करुर येथील रॅलीत मोठी चेंगराचेंगरी झाली होती. यात ४१ नागरिकांचा मृत्यू झाला होता तर, अनेकजण जखमी झाले होते. सध्या सीबीआय घटनेचा तपास करत असून, विजयला चौकशीसाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
तमिळनाडूमध्ये येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सुपरस्टार विजय अभिनयानंतर राजकारणात नशीब आजमावत आहे. त्याच्या तमिलगा वेत्री कझगम पक्षाला राज्यातून चांगला प्रतिसादही मिळत आहे. विजय राज्यभर करत दौरे करत आहे. सेलममधील सीलानाईकेनपट्टी येथेही आयोजित सभेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याने संबोधित केले.













