पर्यावरण वाचविण्यासाठी आंदोलनात सहभागी झालो तेव्हा प्रत्येक वेळेला मला शहरी नक्षलवादी ठरविण्यात आले. जो कोणी पर्यावरणाबद्दल बोलतो, शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो तो यांच्यादृष्टीने शहरी नक्षलवादी असतो. घोडाझरी अभयारण्य, ताडोबा अभयारण्यातील खाणींचा अट्टाहास असो की, पुण्यातील वेताळ टेकडीतून भूयारी महामार्ग काढणे वा वर्सोवा-भाईंदर किनारा मार्गांसाठी प्रस्ताावित ४५ हजार खारफुटीच्या जंगलांची कत्तल भाजपचा विकासाचा मार्ग नागरिकांना रुग्णालयात पोहचवतो. भाजपला विकास आणि विनाश यातला फरकच कळत नाही, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात केली.
महानगरपालिका निवडणुकीतील मुद्दे, भाजपकडून होणारे आरोप, मुंबईतील पायाभूत सुविधा ते महानगरपालिकेतील ठेवी, अशा विविध विषयांवर आदित्य ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली. पर्यावरणाच्या मुद्द्यावर महायुती सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईतील हवा प्रदुषणाची सध्या परिस्थिती गंभीर आहे. याला सर्वस्वी सरकार आणि पालिका प्रशासन जबाबदार आहे. पर्यावरणाशी या सरकारला काही देणेघेणेच दिसत नाही. विदर्भातील घोडाझरी अभयारण्याच्या ठिकाणी लोहारगड या जागेवर सरकारला खाणकाम सुरू करायचे आहे. केवळ १२ महिनेच निघेल एवढेच खनिज तिथे आहे, त्यातून उत्पन्नही विशेष येणार नाही. शिवाय इथे व्याघ्रप्रकल्पही असताना ही खाण खोदायचीच हा भाजपचा अट्टाहास दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यवतमाळमधील मार्कीमंगली-२ या खाणींसाठीची परवानगी नाकारली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले. ताडोबा सारख्या व्याघ्रप्रकल्प असलेल्या अभयारण्यात खाण कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. पुण्याच्या वेताळ टेकडीतून भुयारी मार्ग काढण्याचा घाट घातला जात आहे. पुण्याचे सर्व नागरिक सांगताहेत की, यातून वाहतुकीच्या वेळेत फार काही फरक पडणार नाही, या रस्त्याची गरज नाही, तरी भाजपला वेताळ टेकडीतून बोगदा काढायचाच आहे, शिवाय शेजारून मेट्रोसाठीही बोगदा काढणार आहेत आणि वरून पूलही बांधणार आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील हजारो एकर जागा विकासकांना आंदण दिली जात असल्याच्या ‘लोकसत्ता’ च्या वृत्ताची दखल घेत सरकारने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलातील येऊरमध्ये असलेले बंगले यांना नियमित करायचे आहेत. हाच यांचा एक कलमी कार्यक्रम आहे, राजस्थानचे आपण काैतुक करायला हवे की, अरावलीसाठी राजस्थानमध्ये लाखो लोक घरदार सोडून रस्त्यावर उतरले. त्यामुळे आरवली वाचली. वेताळ टेकडीसाठी पुण्यामध्ये मानवी साखळी करण्यात आली. तिथे लोकांनी सांगितले जोपर्यंत वेताळ टेकडी वाचविण्याचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मतदान करणार नाही. लगेच भाजपने तिथल्या कामाला स्थगिती दिली. नाशिकच्या तपोवनासाठीही आंदोलन झाले, इथली झाडे तोडू देणार नाही, असे प्रतिज्ञापत्र मी स्वत: तिथे जाऊन देऊन आलो, असेही ठाकरे यांनी सांगितले.
पर्यावरणाचा मुद्दा कोणताच राजकीय पक्ष लाेकांपर्यंत का घेऊन जात नाहीत, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, भाजप सरकारचे पर्यावरण विषयक प्रेम किती बेगडी आहे, हे अनेकदा अनुभवास आले. नाशिकमधील तपोवन, चंद्रपूरमधील कोळसा खाणी, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मिठी नदी. असे पर्यारवणासंबंधित विषय आम्ही वारंवर मांडले आहेत. २०१६ साली मी आरेच्या जंगलाबद्दल बोललो, हे सर्व मतांसाठी नाही तर पर्यावरण वाचविण्यासाठी आम्ही करतो आहोत. आपले पर्यावरण बिघडत चालले आहे. अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आरे विषयीच्या आपल्या लढ्याला साथ दिली. तपोवनातील झाडे वाचविण्यासाठी ते ही आंदोलनात सहभागी झाल्याची आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली.
विकासाच्या नावाखाली जे रस्ते बांधण्यात आले आहेत. त्यातील एकतरी दर्जेदार रस्ता बांधण्यात आला आहे का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईतील वर्सोवा-भाईंदर सागरी मार्ग प्रकल्पासाठी सुमारे ४५ हजार खारफुटीची झाडे तोडली जाणार आहेत. आराखडा बदलून खारफुटीची झाडे वाचवता आली असती. पर्यावरण आणि विकास शाश्वत होऊ शकतो, आतापर्यंत तो होत आला आहे. औद्याेगिक क्रांती झाली तेव्हाही शाश्वत विकासच झाला आहे, तर आता का हाेऊ शकत नाही? भाजपला हिमालय पोखरायचा आहे. आरवली, पश्चिम घाट आणि सह्याद्रीही संपवायचा आहे, अशी टीका त्यांनी केली.
मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईचा हवामान कृती आराखड्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. आपण पर्यावरणमंत्री असताना नाशिक, पुणे, ठाणे, सोलापूरसाठी आम्ही हवामान कृती आराखडा तयार केला. यात दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४० प्रमुख शहरांना २०४० पर्यंत प्रदूषणमुक्त करण्याचा उद्देश होता. यासाठी स्वयंसेवी संस्थांची नेमणूकही केली. विद्युत वाहनांचे धोरण, कचरा विलगीकरण योजना याचा यात समावेश होता. महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरील अहवाल वाचून तशा उपाययोजना करायला हव्यात, असेही ते म्हणाले. विशेषत: मुंबईत बांधकाम व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. बांधकामे थांबवू नका, विकास थांबवू नका, पण बांधकाम व्यवस्थापन करायला हवे. त्यासाठी वेळेचे नियोजन करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.














