नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमपत्रिकेत उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नाही. येथील सत्ताधारी असलेल्या भाजपकडून एकनाथ शिंदे यांचे नाव वारंवार डावलले जात असल्याने शिवसेनेच्या वतीने आज आक्रमक आंदोलन केलं. वाशी येथील रूग्णालयात असलेल्या कार्यक्रमाला गणेश नाईक आले असता त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नवी मुंबईतील गणेश नाईक आणि शिवसेना यांचे सख्य होणार नसून विळ्या भोपळ्यांचे नाते कायम राहणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. तर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला असून त्यांचा वेगळा मनमानी कारभार चालला असल्याचं सांगत हल्लाबोल केला आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. नवी मुंबई मनपातर्फे उद्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा होणार आहे. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावचं छापलेलं नाही. नवी मुबंईत उद्या आरोग्य सेवा कामांचा लोकर्पण सोहळा आहे. या कार्यक्रमात आमदार व वनमंत्री गणेश यांचं नाव आहे तसेच खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव आहे. मात्र ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नवी मुबंई पालिकेच्या पत्रिकेत नाही. नवी मुबंईच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना डावललं गेल्याच्या चर्चा आहेत.
याचा निषेध व्यक्त करत आज वनमंत्री गणेश नाईक यांची गाडी अडवण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यक्रम पत्रिकेत नाव न टाकल्याने हे आंदोलन केले जात आहे, शिवसैनिक, शिवसेनेचे नगरसेवक त्यांना उत्तर देतील असं नरेश मस्के यांनी म्हटलं होतं. यावेळेस शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसून आले. नवी मुंबईमध्ये आरोग्यविषयक योजनांचा, त्यासंदर्भातल्या घोषणांचा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे. त्या कार्यक्रम पत्रिकेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव टाकलेलं नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्यावतीने आज आंदोलन गेले, त्याचबरोबर या पत्रिकेमध्ये खासदार नरेश म्हस्के यांचे देखील नाव आहे, एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांचं देखील नाव आहे, पण एकनाथ शिंदे यांचं नाव टाकण्यात आलेलं नाही. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, या पत्रिकेत त्यांचे नाव नसल्याने शिवसैनिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
तर या संदर्भात एबीपी माझाशी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, ज्या पद्धतीने नवी मुंबईचा कारभार सुरू आहे तो चुकीचा आहे, ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आहे, यापूर्वी सुद्धा शिवसेनेची एकहाती सत्ता होती युतीशिवाय, आता युती आहे, त्या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणचे मंत्री असो, कोणी असो, त्यांचं नाव टाकत असतो, नवी मुंबईमध्ये हम करे सो कायदा असा जो काहीच खेळ सुरू आहे, अशी जी राजवट सुरू आहे, दुसऱ्याची ती रेष पुसून स्वतःची रेष मोठी करता येत नाही, त्यासाठी स्वतःची रेष स्वतः काम करून मोठी करावी लागते, एकनाथ शिंदे यांचं नाव राज्यातील जनतेच्या हृदयावरती कोरलेलं आहे, कोणी माईचा लाल आला ना, तरी शिंदे साहेबांचे नाव पुसू शकत नाही. नवी मुंबईमध्ये अतिशय जगा वेगळा कारभार सुरू आहे. इतर ठिकाणी एक नियम आणि नवी मुंबईमध्ये वेगळा नियम असा कारभार सुरू आहे. जनता त्याचं चोख उत्तर देणार आहे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव प्रशासनाने त्या पत्रिकेत ठेवलं होतं, परंतु प्रशासनाला याचा जाब विचारला असता, त्यांनी सांगितलेला आहे की, गणेश नाईक आणि महापौर यांनी शिंदे साहेब यांचं नाव कट केलेलं आहे अशा पद्धतीचा उत्तर आयुक्तांनी दिलेला आहे, अशी माहिती म्हस्केंनी दिली.
प्रशासनाने सांगितलं आमच्याकडच्या पत्रिकेमध्ये नाव होतं आणि वास्तविक जे काही काम आहे, ते मी स्वतः पाठपुरावा करून ते पत्र दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब मंत्री असताना त्यावेळी महानगरपालिका अस्तित्वात नव्हती. त्यांच्या सांगण्यावरून डायलिसिस सेंटर असो, सिटीस्कॅन असो, हे सगळं मी स्वतः पाठपुरावा करून या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु उद्घाटन करताना कुठेही विश्वासात घेतलेलं नाही. महापौर त्यांचा आहे. म्हणून काहीही करणे योग्य नाही. मी राज्यमंत्री मंडळाला विनंती करतो की, नवी मुंबई काही बिहारमध्ये नाही किंवा झारखंडमध्ये नाही, त्यासाठी वेगळे नियम आहेत का? नगर विकास खात्याचे किंवा मंत्रालयाचे मग आम्ही जर ठाणे महानगरपालिकेत अशी जर कृती केली तर चालणार आहे का? हा सुद्धा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करत आहे आणि महानगरपालिकेमध्ये गणेश नाईक यांचा काही संबंध नसताना, आम्ही त्यांचं नाव त्या पत्रिकेत टाकत असतो, मग अशा पद्धतीने वागणूक का? एकनाथ शिंदे यांचं नाव यांनी काढायला लावलं, म्हणून एकनाथ शिंदे यांना काही होतं नाही, परंतु यांच्याच पक्षाचे आमदार अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा विरोध करत आहेत, लोक यांना काय आहे ते दाखवत आहेत, त्यामुळे हे छोटे होणार आहेत, एकनाथ शिंदे छोटे होणार नाहीत, एकनाथ शिंदे यांना कितीही छोटं करण्याचा प्रयत्न केला, तरी ते छोटे होणार नाहीत. याचं भान ही गोष्ट ज्यांनी केली आहे त्यांनी लक्षात ठेवावं असे हे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
सगळ्यांचा मान-सन्मान राहील, असे काम झाले पाहिजे, पण तसे काम होत नाही. आमदार मी आहे, पण कार्यक्रमात मला मानसन्मान मिळत नाही. आता मी निर्णय घेणार, यांच्यामुळे (गणेश नाईक) मी कंटाळली आहे. माझ्यावर सतत अन्याय केला जातोय. मी आमदार असताना येथील कार्यक्रमात मला डावलले जात आहे. मी वनमंत्री गणेश नाईक यांच्या कार्यक्रमाचा निषेध करते, असे सांगत मंदा म्हात्रे या कार्यक्रमातून बाहेर पडल्या. गणेश नाईक आणि महापौरांनी एकनाथ शिंदे यांचे नाव कट केले, असे आयुक्तांनी मला सांगितल्याचा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला. महापौर त्यांचा आहे म्हणून काहीही करणे योग्य नाही. नवी मुंबई हे काही बिहारमध्ये नाही, झारखंडमध्येही नाही, त्यासाठी वेगळे नियम आहेत का, असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला.













