भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे सुरू आहेत. वनमंत्र्यांनी माकड चाळे थांबवावेत, असं म्हणत शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी गणेश नाईकांवर जहरी टीका केली आहे. दुसऱ्याची उंची कमी केली म्हणून ती कमी होत नसते. असेही ते म्हणाले. ठाणे येथील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना नाव टाळल्याने प्रकाश महाजन हे आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. लोकप्रतिनिधींचे नाव टाळल्यामुळे आयुक्तांना नोटीस बजावायला हवी, असेही महाजन म्हणाले. गणेश नाईक यांनी यापूर्वीही बिबट्या बंदोबस्त करण्यासाठी शेळ्या सोडण्याचे फर्मान काढले होते. त्यावरूनही प्रकाश महाजन यांनी लक्ष्य करत टीका केलीय.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार फुटणार आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रविवारी ‘मातोश्री’ वर झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन जोडले गेले होते. यानंतर खासदार संजय देशमुख यांनी दिल्ली गाठून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींवर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले कि, डॉक्टरांच्या मनात आलं की योग्य वेळी ऑपरेशन होणार. असं म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगरवरून सूचक वक्तव्य केलं.
नेमकं काय आहे प्रकरण?
नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. नवी मुंबई मनपातर्फे उद्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा होणार आहे. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावचं छापलेलं नाही. नवी मुबंईत उद्या आरोग्य सेवा कामांचा लोकर्पण सोहळा आहे. या कार्यक्रमात आमदार व वनमंत्री गणेश यांचं नाव आहे तसेच खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव आहे. मात्र ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नवी मुबंई पालिकेच्या पत्रिकेत नाही. नवी मुबंईच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना डावललं गेल्याच्या चर्चा आहेत.













