राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्ष जोमाने प्रचार करत आहेत. यादरम्यान मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यादरम्यान आज पत्रकार परिषद घेत संदीप देशपांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, “कालपासून समाज माध्यमांवर अनेक चर्चा सुरू होत्या की संदीप देशपांडे यांनी मनसे पक्ष सोडला. काहींनी तर अगदी अतिरंजित बातम्या दिल्या. संदीप देशपांडे यांचा भाजपामध्ये प्रवेश देखील झाला अशा बातम्याही मी पहिल्या. या सर्व गोष्टींना पूर्णविराम देणे आवश्यक होते. काही लोकांनी असंही चालवलं की मला माध्यमांशी बोलायला बंदी घातलेली आहे.”
स्पष्टीकरण देताना संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, “असा कुठलाही विषय नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. माझ्या पक्षाचे मी प्रामाणिकपणे काम करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील ही मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. त्याप्रमाणे मी काम करतो आहे.” यावेळी त्यांनी अशा कुठल्याही अफवा पसरवू नये अशी विनंती देखील संदीप देशपांडे यांनी यावेळी केली.
मनसेची साथ सोडून भाजपामध्ये गेलेल्या संतोष धुरी यांनी मनसेमध्ये कट-कारस्थान होत असल्याचा आरोप करत मनसे नेत्यांची नावे घेतली होती. यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, संतोष धुरी काय बोलतात त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक व्यक्तीचा वेगळा दृष्टीकोन असतो, असे संदीप देशपांडे म्हणाले. तसेच संतोष धुरी यांनी त्यांचा निर्णय घेतला, तो बरोबर आहे की चुकीचा यामध्ये मला जायचे नाही, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले.
मनसेच्या निर्णय प्रक्रियेत डावलंलं जातंय, तसेच युतीच्या निश्चितीमध्ये विचारात घेण्यात आले नाही म्हणून देशपांडे नाराज आहेत अशी चर्चा आहे. याबद्दल विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले की, “जेव्हा मला २०१२ मध्ये राज ठाकरेंनी तिकिट दिलं तेव्हा अनेक जण इच्छुक होते. त्या सगळ्यांना डावलून मला तिकिट दिलं. तेव्हा मी त्यांना हे विचारलं नाही की त्यांना डावलून मलाच का तिकिट दिलं? पक्षाच्या एखाद्या प्रक्रियेत मी नसेन तर मी हे त्यांना का विचारू की या प्रक्रियेत मी का नाही आणि तेच का आहेत? मला वाटतं हा पक्षाचा निर्णय आहे आणि तो आपण मान्य करायला पाहिजे.” तुम्ही नाराज आहेत का? या थेट प्रश्नावर “दिसतोय?” असं एका शब्दात मश्किल उत्तर संदीप देशपांडे यांनी दिले.















