मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भाती मंत्रिमंडळ उपसमितीमधील प्रमुखांची आज महाराष्ट्राच्या महाअधिवक्तांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीकडून आज रात्रीतूनच प्रस्ताव तयार केला जाणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
वर्षा बंगल्यावर फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ वर्षावर पोहोचले आहेत. मराठा आरक्षण उपसमिती आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या बैठकीतील वृत्तांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीमध्ये मराठा आरक्षण उपसमिती आणि महाअधिवक्त्यांशी झालेल्या बैठकीतील वृत्तांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडला जाणार आहे. या बैठकीमध्ये आरक्षणावर काही निर्णय होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











