बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP)ने सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. बीएनपीने 300 पैकी 204 जागा जिंकल्या आहेत. बांगलादेशात सरकार स्थापन करण्यासाठी 151 जागांची आवश्यकता असते. जमात-ए-इस्लामी 76 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इतरांनी 10 जागा मिळवल्या आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी लिहिलंय की, “तारिक रहमान यांच्याशी बोलणं आनंददायी होतं. बांगलादेश निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयाबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. बांगलादेशच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न ते करत आहेत, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच पाठिंबा व्यक्त केला.”
पंतप्रधान मोदींनी लिहिलंय की, “सखोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध असलेले दोन जवळचे शेजारी देश असल्याकारणाने, मी दोन्ही देशांच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी भारताच्या कटीबद्ध असल्याचा पुनरूच्चार केला.”
दरम्यान मतमोजणी सुरु असताना दोन्ही पक्षांनी मतदानात हेराफेरीचा आरोप केला आहे. 2024 मध्ये शेख हसीनांना सत्तेवरून काढून टाकण्याच्या उद्देशाने युवा चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल सिटीझन्स पार्टी (NCP) ने निकालांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशातील एनसीपी या पक्षाने फेरमोजणी करण्याची मागणी केली आहे. इतर दोन पक्षांच्या उमेदवारांनीही असेच आरोप करून निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला आहे. बीएनपी ने जमात-ए-इस्लामीवर फसवणुकीचा आरोप केला आहे.













