गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे शहरातील बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. मंगळवारी (दि. 17) देखील पुणे पोलिसांकडून बुधवार पेठ इथं करण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ११ बांगलादेशी महिला सापडल्या असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या महिला काही महिन्यांपासून शहरात बेकायदेशीरपणे राहात होत्या हे उघडकीस आलं आहे.
“मी सुरुवातीला म्हणालो होतो की, बुधवार पेठेत बेकायदेशीर हालचाली सुरू आहेत. त्यावर कारवाई केली जाणार असं सांगितलं होतं. त्यानुसार आम्ही काल रात्री पुन्हा कारवाई केली. या कारवाईत आम्ही एकूण 22 महिलांना ताब्यात घेतलं. त्यापैकी 11 महिला बांगलादेशी असल्याचं स्पष्ट झालं आहे. बुधवार पेठ परिसरात अशा हालचालींना मदत करणाऱ्या सर्वांना आरोपी करण्यात आलं आहे. जे-जे बेकायदेशीर आहे, त्याविरोधात कारवाई केली जाईल. यासह बुधवार पेठ परिसरातील सर्व इमारतींची तपासणी करून कारवाई केली जाईल. सध्या बुधवार पेठेत सुरू असलेली कारवाई कायदेशीर आहे. गरज पडल्यास आणखी जोरदार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
“बुधवार पेठेत महिला आणणाऱ्या दलालांवर कारवाई केली जाणार आहे. पिटा ऍक्टनुसार करवाई सुरू आहे. जी कारवाई सुरू आहे ती नियमांच्या अधीन राहून सुरू आहे. ज्यांनी कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केलेत ते चुकीचं आहे. बुधवार पेठेत होणाऱ्या हालचालींवर पोलीस बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. तिथं जे काही बेकायदेशीर असेल त्यावर कारवाई करण्यात येईल,” असंही ते म्हणाले.
भारतात बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा सध्या गाजत असताना पोलिसांनी अशा प्रकारे बांगलादेशी महिलांवर केलेल्या कारवाईमुळं गोंधळ उडाला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.















