कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. महायुतीमधील शिवसेनेने (शिंदे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा घेतला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे आणि शिवसेना (शिंदे) एकत्र सत्तेत असणार असे जाहीर केले. मनसेच्या नेत्यांनीही या आघाडीचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता वेगळीच चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींवर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोकण भवनात नगरसेवकांची गट नोंदणी केल्यानंतर राजू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आम्हाला काय भेटण्याऐवजी सत्तेत असल्याने विकासाची कामे होतील यासाठी आम्ही पाठिंबा दिला. आम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत युतीत लढलो होतो. निकालानंतर काही नगरसेवक गायब झाले. त्यामुळे आम्हाला आमच्या नगरसेवकांचीही चिंता होती आणि त्यांच्याही नगरसेवकांची चिंता होती. कल्याण डोंबिवलीतील जनता पळवापळवीच्या राजकारणाला कंटाळली होती हे कुठेतरी थांबावे म्हणून आम्ही पाठिंबा दिला. कुठल्याही स्वार्थासाठी घेतलेला हा निर्णय नाही. आम्ही ठामपणे सामोरे आलो आहोत. जेव्हा आमचे निकाल समोर आले आणि आम्ही इथलं गणित राज ठाकरेंना सांगितले तेव्हा स्थानिक पातळीवर जो तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तो घ्या असं साहेबांनी सांगितले. त्यानुसार आम्ही निर्णय घेतला आहे असं पाटील यांनी सांगितले.
त्याशिवाय भाजपा-शिंदेसेना एकत्र आहेत मग भाजपाला बाजूला ठेवायचा प्रश्न नाही. मला कल्याण डोंबिवतील जनतेलाही प्रश्न विचारायचा आहे. ५ नगरसेवकांमध्ये आम्ही सत्तेच्या बाहेर राहून जनतेला न्याय देऊ शकलो असतो का? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही अंकुश ठेवू शकतो. भलेही आम्ही त्यांची सत्ता पाडू शकत नाही मात्र आमचे जे मुद्दे आहेत, किमान समान कार्यक्रम घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी टीका टीप्पणी अनेकांनी केली आहे. काही ठिकाणी मनसे-उद्धवसेनेचे उमेदवार आमनेसामने लढले. परंतु आता ही वेळ नाही. स्थानिक पातळीवर हे विषय होतात. दोन्ही पक्ष नेतृत्वाचा त्यात दोष नव्हता. आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन पुढे चाललोय. कल्याण डोंबिवलीत एक स्थिरता आणायची होती त्यामुळे आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे असं राजू पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत असं राज ठाकरेंनी सांगितले होते. स्थानिक राजकारण जे सुरू होते त्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या नेत्यांनी घेतला आहे. आम्ही कल्याण डोंबिवलीत सगळ्यांसोबत लढलो. ८ ठिकाणी उद्धवसेनेचेही उमेदवार आमच्याविरोधात होते. एकदा निवडणूक संपल्यानंतर आमचे निवडून आलेले नगरसेवक त्यांना जे वाटते त्यानुसार निर्णय घेण्याची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिली होती. त्यानुसार स्थानिक जनतेच्या हिताला प्राधान्य देत राजू पाटील यांनी निर्णय घेतला आहे अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.













