भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि उत्तर भारतीय समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचं निधन झालं. राज पुरोहित यांनी मुंबईतील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं मुंबईच्या राजकारणातील एक अनुभवी, अभ्यासू आणि स्पष्टवक्ता नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी आदरांजली भाजपाच्या वतीनं अर्पण करण्यात आली.
त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधीच त्यांचे पुत्र आकाश राज पुरोहित यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड. क्रमांक 121 मधून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. मात्र या विजयाचा त्यांना फार जल्लोष करता आला नाही. पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव रविवारी, 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत मरीन ड्राइव्ह येथील राजहंस बिल्डिंग इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात येतील. राज पुरोहित यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. “पक्षानं एक निष्ठावान नेता आणि मार्गदर्शक गमावला आहे. मुंबईच्या विकासात आणि भाजपाच्या विस्तारात त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील,” अशा शब्दांत भाजपाच्या नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात परिवार आणि मोठा चाहता वर्ग आहे.
राज के. पुरोहित यांची ओळख मुंबईतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये होत असे. मुंबई भाजपाच्या संघटनात्मक विस्तारात त्यांचं योगदान मोलाचं आहे. त्यांनी काही काळ भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. 1995 साली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना–भाजपा युती सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. पक्षबांधणीपासून ते सत्ताकाळातील निर्णयप्रक्रियेपर्यंत ते सक्रीय होते होते.
विधिमंडळातील अभ्यासपूर्ण वक्ते म्हणून त्यांची विशेष ओळख होती. 1990 मध्ये मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग 4 वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. पुढं 2014 मध्ये ते कुलाबा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. स्पष्टवक्तेपणा, आक्रमक भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांवरील ठाम मांडणी हीच त्यांची ओळख होती. गिरगाव, काळबादेवी आणि मुंबादेवी परिसरातील स्थानिक प्रश्नांवर त्यांची मजबूत पकड होती. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये ते ‘राजभाई’ म्हणून ओळखले जात. पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारा नेता म्हणूनही त्यांचा मोठा दरारा होता.














