kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पालघरमध्ये शिंदे गटाचा भाजपला दणका ; नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरत आणि राजेंद्र माच्छी विजयी

पालघर जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू या दोन नगरपरिषदांवर भाजपला शिवसेना शिंदे गटाने जोरदार दणका दिलाय. पालघर नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम घरत हे जवळपास 4000 मताधिक्याने विजयी झाले आहेत. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास म्हात्रे यांचा दारुण पराभव केलाय.

दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गट आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची असलेल्या डहाणू नगर परिषदेत देखील शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारलीये. डहाणू नगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माच्छी 3325 इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा पराभव केला आहे.

पालघर जिल्ह्यात भाजपकडून मंत्री गणेश नाईक , खासदार हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह माजी आमदार रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

पालघर नगरपरिषद हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. तरी शिवसेना पक्ष फुटीनंतर हा बालेकिल्ला भाजपने आपल्याकडे खेचण्यास डावपेच सुरू केले होते. मात्र शिवसेना शिंदे गटाने भाजपचा हा डाव उधळून लावला आहे. नगराध्यक्ष पदांसह 30 नगरसेवक पदांपैकी तब्बल 19 नगरसेवक निवडून आणत पालघर नगर परिषदेत आपला भगवा शिवसेना शिंदे गटाने कायम ठेवलाय .

डहाणू नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक भाजप पेक्षा कमी निवडून आले असले तरी येथील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. डहाणू नगरपरिषदेत 27 जागांपैकी भाजपने आपले 17 नगरसेवक निवडून आणले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ तर शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत .

भाजपला एकाकी पडत शिवसेना शिंदे गटाने इतर सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवला असून सर्व एकत्र आले तरी देखील आमचा विजय पक्का आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूत प्रचारादरम्यान व्यक्त केला होता.