महाराष्ट्रात वादाच्या भोवऱ्यात सापडलेला त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित होते.
त्रिभाषा सूत्र कुठल्या वर्गापासून लागू करावं, यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तसंच, “या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करू, आमच्यासाठी मराठी महत्त्वाची आहे. आमची नीती मराठीकेंद्रित असून, यात राजकारण करायचं नाही,” असंही फडणवीस म्हणाले.
आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या विषयावर चुकीच्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही यावर सांगोपांग चर्चा केली. तसेच असा निर्णय केला की, त्रिभाषा सूत्रासंदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशाप्रकारे करावी, कुठली भाषा करावी, मुलांना काय निवड द्यावी याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक समिती तयार करण्यात येईल.”
“या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येईल. म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी समिती त्रिभाषा सूत्रासंदर्भात सर्व गोष्टींचा अभ्यास करेल”.
“ही समिती त्रिभाषा सूत्रावर दुमत असलेल्या लोकांचंही मत ऐकून घेईल. त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो घेईल. तो निर्णय राज्य सरकार स्विकारेल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. असा निर्णय आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. आमच्यासाठी मराठी आणि मराठी विद्यार्थी हाच महत्त्वाचा आहे. आमची नीती मराठीकेंद्री असेल, मराठी विद्यार्थीकेंद्री असेल. यात आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही,”














