आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर या तीन एकेरी अतिरिक्त आषाढी रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर विविध स्थानकांवरून सध्या ८३ आषाढी विशेष गाड्या धावत आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीचे औचित्य साधून दर वर्षी अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात. अनेक भाविक रेल्वेने पंढरपूरला जातात, तर काही भाविक, पालखी सोहळा ज्या ठिकाणी पोहचला आहे, तेथून वारीत दाखल होतात. यंदा मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरून ८३ आषाढी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. आता मध्य रेल्वे नव्याने आणखी तीन अतिरिक्त विशेष आषाढी रेल्वे सोडणार आहे.
कोणत्या मार्गावरून गाड्यांचे नियोजन ?
पुणे – मिरज विशेष रेल्वे
गाडी क्रमांक ०१४१३ : ही विशेष एकेरी रेल्वे ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता पुणे स्थानकावरून निघेल आणि दुपारी १२.३० पर्यंत मिरज स्थानकापर्यंत पोहचेल. ही गाडी लोणंद, सातारा, कराड, किर्लोसकरवाडी आणि सांगली अशी धावेल.
मिरज-नागपूर विशेष रेल्वे
गाडी क्रमांक ०१२१३ : ही विशेष एकेरी रेल्वे ८ जुलै रोजी मिरज स्थानकातून दुपारी १२.५५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता नागपूरला पोहचेल. आगर, कवठे महाकाळ, धालगाव जठ रस्ता, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगांव, जळगांव, भूसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, पंढरगाव, चांदणगांव या मार्गे धावेल.
मिरज – लातूर एकेरी अनारक्षित रेल्वे
गाडी क्रमांक ०१४०९ : ही विशेष रेल्वे ६ जून रोजी सकाळी ९ वाजता मिरज स्थानकावरून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ७.२० वाजता लातूर स्थानकात पोहचेल. आगर, कवठे महाकाळ, धालगांव, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डूवाड, शेंद्री, बार्शी, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब, ढोकी, मुरूड, औसा रस्ता आणि हरंगुळ असा गाडीचा मार्ग असले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पुणे रेल्वे स्थानकावरून ८ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विशेष रेल्वे साेडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन वातानुकूलित डबे, १० आरामदायी, द्वितीय श्रेणीतील दोन आणि चार सामान्य अशी गाडीच्या डब्यांची रचना असणार आहे. भाविक, वारकऱ्यांना इच्छितस्थळी जाण्यासाठी ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. – हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग.
First published on: 27-06-2025 at 07:13 IST | © The Indian Express (P) Ltd
Web Title: Pune special trains on the occasion of ashadhi ekadashi pune print news ocd












