केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२६-२७चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करीत आहेत. त्यांनी भारतात बायोफार्मा शक्तीची घोषणा केली आहे, जी मधुमेह, कर्करोग आणि इतर रोगांसारख्या असंसर्गजन्य आजारांसाठी नवीन उपचार, औषधे आणि संशोधन विकसित करणार आहे. लोकांना सर्वात जास्त प्रचलित आजारांशी लढण्यास मदत करण्यासाठी देशभरात तीन राष्ट्रीय संस्थादेखील स्थापन केल्या जातील. सरकारने या योजनेसाठी 10 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे.
अर्थमंत्र्यांनी देशाला बायोफार्मा केंद्र बनवण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल जाहीर केलं आहे. २०२६ चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बायोफार्मा क्षेत्रासाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, ज्या अंतर्गत तीन नवीन उच्च शैक्षणिक संस्था उघडल्या जातील. देशभरात ३ नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था उघडण्याबरोबर बायोटेक आणि औषधनिर्माण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी “बायोफार्मा शक्ती” प्रकल्पाची घोषणा देखील केली आहे.
या दूरदर्शी प्रकल्पामुळे केवळ औषध निर्मितीला गती मिळणार नाही, तर संशोधन आणि उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी तीन नवीन उच्च शैक्षणिक संस्थादेखील स्थापन होतील. सरकारचा हा मास्टरस्ट्रोक जागतिक आरोग्यसेवा बाजारपेठेत भारताला एक नवीन नेता म्हणून स्थान देण्यास सज्ज असल्याचंही निर्मला सीतारामण यांनी अधोरेखित केलंय. भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार १,५०,००० विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रशिक्षित करेल. रेडिओलॉजी आणि कर्करोग संशोधनाला देखील प्रोत्साहन दिले जाणार आहे, ज्यामुळे या आजारांविरुद्धच्या लढाईला आणखी बळकटी मिळेल. निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे की, देशाची आरोग्यसेवा व्यवस्था सर्वसामान्यांसाठी सुलभ केली जाणार आहे, देशातील आयुष विभाग अधिक मजबूत केला जाणार आहे.
यासाठी आयुर्वेदिक औषधांच्या निर्यातीसाठी सविस्तर चौकटही जाहीर करण्यात आली आहे. सध्या देशातून आयुर्वेदिक औषधे मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात असली तरी अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे भविष्यात ही गती वाढेल. तसेच वैद्यकीय पर्यटनाबाबत अर्थमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणाही केली. त्यांनी सांगितले की, भारत प्रगत आरोग्यसेवा प्रणालीने सुसज्ज असेल आणि वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र बनवले जाणार आहे.













