राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारसदार आहेत. त्यांना आधी उपपंतप्रधान बनवावं, अशी संघाची भूमिका आहे. संघात तशी चर्चा सुरू आहे. येत्या तीन महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. राजकीय भूगर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा दावा केला आहे. या क्षणी भूगर्भातील हालचाली सुरू आहेत. भूकंप होण्याआधी छोटेमोठे धक्के जाणवतात. खाटा हलतात, पंखे हलतात. देशात आणि भाजपच्या अंतर्गत सध्या तेच सुरू झालं आहेत. जानेवारीत देशाच्या राजकारणात फार मोठे फेरबदल होताना दिसतील. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत फार मोठे भूकंपाचे धक्के दिसतील असं ते म्हणाले.
फडणवीस यांची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती व्हावी, असं संघाचं म्हणणं आहे. कुणी काहीही म्हणू द्या. फडणवीस यांनाच उपपंतप्रधान म्हणून जागा मिळावी, तेच मोदींचे वारसदार असावे, असं संघ राष्ट्रीय स्तरावर म्हणत आहे. संघात तशी चर्चा आहे. असं घडत असेल तर फडणवीस यांना आवाहन आहे, त्यांनी महाराष्ट्रात लोकशाहीची पायाभरणी करावी. मोदी लोकशाही विरोधी आहेत, म्हणून त्यांना जावं लागत आहे. हा धडा फडणवीस यांनी जाण्याआधी घेतला पाहिजे. मोदींविरोधात लोकांनी बंड का पुकारलं आहे. तुम्ही कितीही मोठे असाल, उद्योगपतींचा पाठिंबा असेल तरीही लोक रस्त्यावर येऊन पळून पळून मारतील. ती वेळ येऊ नये म्हणून अनेक काही लोकं सरकारपासून दूर होण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा राऊतांनी केला आहे.













