मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. गुरुवारी सकाळी 7.30 वाजता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होईल. त्यानंतर 16 जानेवारीला लगेच मतमोजणी होऊन या निवडणुकीला निकाल जाहीर केला जाईल. मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मुंबईकरांना ठाकरे बंधूंच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
संजय राऊतांच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘सर्व मराठी माणसांचं ठरलंय… एक आहे तर सेफ आहे! आणि ठाकरेच बेस्ट आहे’, असे या मजकुरात लिहले आहे. दरम्यान, आज सकाळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. यावेळी शिवतीर्थावर संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. याठिकाणी राज आणि उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबादेवीच्या दर्शनाला गेले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या 227 प्रभागांसाठी 15 जानेवारीला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदानप्रक्रिया संपन्न होईल. त्यानंतर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
एकीकडे संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना मतदान करण्याचे आवाहन केले असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत मुंबईकरांना साद घातली आहे. हिंदूंच ठरलंय, आय लव्ह महादेवच…, असा मजूकर असलेली पोस्ट नितेश राणे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या माध्यमातून नितेश राणे यांनी मुंबईकरांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन साद घालण्याचा प्रयत्न केला आहे.












