महानगरपालिकेचे निकाल समोर येत आहेत. यावेळी, मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर घेतलेली सभा वातावरण पालटवणारी ठरली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला मोठे यश मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु, प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. त्यामुळे मनसेचे नेमके कुठे चुकले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी दिलेल्या एका इशाऱ्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी संतोष धुरी यांनी मुंबई महानगरपालिकेत मनसेच्या फक्त सात ते आठ जागाच निवडून येतील, असे म्हटले होते. मुंबईत मनसेला 52 जागा सोडल्याचे दिस आहेत. मात्र, त्यापैकी सात किंवा आठ सीट निवडून येईल की नाही, याचीही शाश्वती नाही. उद्धव ठाकरे गटाने आम्हाला पाहिजे त्या सीट दिल्या नाहीत. उलट ज्या जागांवर ठाकरे गटाकडे उमेदवारच नव्हते किंवा ज्याठिकाणी त्यांच्या विद्यमान नगरसेवकाचे नाव खराब झाले होते, अशा जागा ठाकरे गटाने मनसेला देऊ केल्या. माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या मराठा माणसांचा टक्का जास्त असलेल्या भागांमध्ये मनसेची फक्त एका जागेवर बोळवण करण्यात आली. ठाकरे गटाने त्यांना ज्या सीट सोडायच्या होत्या, त्याच मनसेला दिल्या, असे संतोष धुरी यांनी म्हटले होते.














