पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांच्या तक्रारींनंतर भारतीय निवडणूक आयोगानं फाल्टा विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतदान (री-पोलिंग) घेण्याचे आदेश दिले आहेत. पारदर्शक आणि निष्पक्ष मतदान प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे.
यापूर्वी शनिवारी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रांवर पुनर्मतदान पार पडलं होतं. यामध्ये मगराहाट पश्चिम येथील 11 आणि डायमंड हार्बर येथील 4 मतदान केंद्रांचा समावेश होता. आता फाल्टा मतदारसंघातही अशाच प्रकारची परिस्थिती लक्षात घेऊन पुनर्मतदान होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर प्रशासनानं आवश्यक तयारीला वेग दिला आहे. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील हाशिमनगर परिसरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर भारतीय निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.
29 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या मतदानादरम्यान घडलेल्या गंभीर अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हे पाऊल उचललं आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी फाल्टा येथील अनेक मतदान केंद्रांवर ‘निवडणूकविषयक गुन्हे’ आणि ‘लोकशाही प्रक्रियेचं उल्लंघन’ झाल्याच्या गंभीर घटनांची नोंद करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं की, निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आणि लोकशाही संकेतांचं पालन करण्यासाठी, या मतदारसंघातील सर्व 285 केंद्रांवर (सहाय्यक मतदान केंद्रांसह) नव्यानं निवडणुका घेणं आवश्यक झालं होतं.
पश्चिम बंगालमधील फलता विधानसभा मतदारसंघात आता सर्व 285 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान (री-पोलिंग) घेण्यात येणार आहे. या निर्णयात सहाय्यक मतदान केंद्रांचाही समावेश असेल. सर्व केंद्रांवर एकाच वेळी मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून, प्रत्येक ठिकाणी समान वातावरण राखून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला आळा घालण्याचा उद्देश आहे.
निवडणूक आयोगानं या री-पोलिंगची तारीखही निश्चित केली आहे. 21 मे 2026 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या काळात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, जेणेकरून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडेल. री-पोलिंग पूर्ण झाल्यानंतर 24 मे 2026 रोजी मतमोजणी केली जाणार असून त्याच दिवशी निकाल स्पष्ट होईल आणि उमेदवारांचं भवितव्य ठरेल.













Leave a Reply